पुणे : देशभरात स्वतंत्र कार्यालयीन जागांना मागणी कमी झाली आहे. त्याचवेळी को-वर्किंग स्पेसला मागणी वाढली आहे. मागील चार वर्षांत कार्यालयीन जागांमध्ये को-वर्किंगचे प्रमाण दुपटीने वाढले आहे. २०२० मध्ये ११ टक्के असलेले हे प्रमाण यंदा २४ टक्क्यांवर पोहोचले आहे.
अनारॉक ग्रुपने देशातील प्रमुख महानगरांतील मालमत्ता क्षेत्राचा अहवाल जाहीर केला आहे. त्यात मुंबई, पुणे, दिल्ली, हैदराबाद, चेन्नई, बंगळूरु आणि कोलकाता या महानगरांचा समावेश आहे. या अहवालानुसार, कार्यालयीन जागा भाड्याने घेण्यामध्ये घट होत आहे. आगामी काळातही अशीच परिस्थिती राहण्याची शक्यता आहे. कार्यालयीन जागा भाड्याने घेण्यात सर्वाधिक वाटा माहिती तंत्रज्ञान (आयटी) कंपन्यांचा असतो. आयटी कंपन्यांचा हा वाटा २०२० मधील पहिल्या सहामाहीत ४६ टक्के होता. तो यंदा पहिल्या सहामाहीत २९ टक्क्यांवर घसरला आहे.
हेही वाचा… ‘ईपीएफओ’ची ईटीएफमध्ये २७ हजार कोटींची गुंतवणूक
विशेष म्हणजे को-वर्किंग स्पेसला मागणी वाढत आहे. स्वतंत्र कार्यालयापेक्षा छोट्या कंपन्यांकडून को-वर्किंग स्पेसला पसंती दिली जात आहे. एकूण भाड्याच्या कार्यालयीन जागांमध्ये को-वर्किंग स्पेसचे प्रमाण २०२० च्या पहिल्या सहामाहीत ११ टक्के होते. ते यंदा पहिल्या सहामाहीत २४ टक्क्यांवर पोहोचले आहे. को-वर्किंग स्पेस अधिक लवचीक आणि खर्चात बचत करत असल्याने त्यांच्याकडे कल वाढला आहे, असे अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.
कार्यालयीन जागांच्या भाड्यात ७ टक्के वाढ
कार्यालयीन जागांच्या भाड्यात मागील वर्षीच्या तुलनेत यंदा पहिल्या सहामाहीत ७ टक्के वाढ नोंदविण्यात आली आहे. चेन्नईत सर्वाधिक १० टक्के वाढ नोंदविण्यात आली असून, कार्यालयीन जागेचे सरासरी मासिक भाडे ९० प्रति चौरसफूट आहे. मुंबई ५ टक्के वाढीसह भाडे १३६ रुपये प्रति चौरसफूट, पुण्यात ७ टक्के वाढीसह ७९ रुपये प्रति चौरसफूट, दिल्लीत ५ टक्के वाढीसह ८५ रुपये प्रति चौरसफूट, हैदराबाद ८ टक्के वाढीसह ६६ रुपये प्रति चौरसफूट, बंगळूरु ७ टक्के वाढीसह ९० रुपये प्रति चौरसफूट आणि कोलकाता ७ टक्के वाढीसह ५८ रुपये प्रति चौरसफूट आहे.
आपल्याकडे प्रामुख्याने अमेरिकी आयटी कंपन्यांकडून कार्यालये भाड्याने घेतली जातात. आयटी कंपन्यांकडून कार्यालयीन जागांची मागणी कमी आहे. स्वतंत्र कार्यालय भाड्याने घेण्यापेक्षा को-वर्किंग स्पेसचा पर्याय अनेक छोट्या कंपन्या निवडत आहेत. – आदिती वाटवे, प्रमुख, अनारॉक