मुंबई: बिहारबद्दलचा रुळलेला समज आणि प्रतिमेला बदलून, औद्योगिक आघाडीवर प्रगतिशील आणि पर्यायाने रोजगारनिर्मितीला चालना देणारे ते राज्य बनण्याची दिशेने, त्या राज्यात प्रथम देश-विदेशातून गुंतवणूकदारांना आवाहन करणाऱ्या ‘बिहार बिझनेस कनेक्ट’चे आयोजन केले जात आहे. त्यानिमित्ताने मुंबईतही संभाव्य गुंतवणूकदार आणि उद्योगपतींशी त्या राज्याच्या उद्योगमंत्र्यांनी सोमवारी भेटीगाठी घेतल्या. इच्छुक गुंतवणूकदारांना बिहारमध्ये येण्याचे आम्ही आवाहन करतो आणि सर्वाधिक ग्राहक असणारे राज्य ते प्रगतीपर सर्वात मोठे उत्पादक राज्य या बदलत असलेल्या धारणेचा प्रत्यय अनुभवावा आणि नंतरच गुंतवणूक करावी की नाही हे ठरवावे, असे त्यांना सांगत असल्याचे बिहारचे उद्योगमंत्री समीर कुमार महासेठ यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.
अन्न-प्रक्रिया, वस्त्रोद्योग, चर्मोद्योग, माहिती-तंत्रज्ञान व पूरकसेवा, इलेक्ट्रॉनिक आणि विद्युत वाहननिर्मिती ही राज्याने प्राधान्य क्षेत्र निर्धारित केली असून, अर्ज केल्यानंतर ३० दिवसांत सर्व प्रक्रियांसह मंजुरी सुकर करणारी एक खिडकी योजना, २४ लाख चौरस फुटांचे संपूर्ण सुसज्ज पायाभूत क्षेत्र, भांडवली गुंतवणुकीवर सवलत आणि व्याज लाभ योजना, मुबलक प्रमाणात तुलनेने स्वस्त उपलब्ध मनु्ष्यबळ हे या राज्याचे वेगळेपण असल्याचे बिहारच्या उद्योग विभागाचे संचालक पंकज दीक्षित यांनी सांगितले.
हेही वाचा… घाऊक महागाईचा सलग सहाव्या महिन्यात उणे दर; खाद्यवस्तूंच्या किमती घटल्याचा परिणाम
हेही वाचा… प्रवासी वाहनांच्या विक्रीचा उच्चांक, सप्टेंबरअखेर संपलेल्या तिमाहीत १० लाख ७४ हजार विक्री
स्थलांतरित बिहारींच्या संख्येत मोठी घट
बिहारमधून देशाची आर्थिक राजधानी मुंबईत रोजगाराच्या शोधात येणाऱ्या स्थलांतरितांच्या संख्येत मोठी घट झाली असून बिहारमध्ये राहून काम करण्यासाठी १५ लाखांहून अधिक लोकांनी राज्य सरकारने सुरू केलेल्या रोजगार पोर्टलवर नोंदणी केली आहे. करोनाकाळात परतलेल्या बहुतांशांनी यातून रोजगार सुरू केला आहे, असा दावा उद्योगमंत्री महासेठ यांनी केला.