तुम्ही कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेचे (EPFO) खातेधारक असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. गेल्या रविवारी कामगार मंत्रालयाने दिलेल्या निवेदनानुसार, जून २०२३ मध्ये एकूण १७.८९ लाख खातेदार EPFO शी संबंधित आहेत. या आकडेवारीनुसार ते मे महिन्याच्या तुलनेत सुमारे ९.७१ टक्के अधिक आहे. याशिवाय या कालावधीत गेल्या ११ महिन्यांपासून म्हणजेच ऑगस्ट २०२२ पासून सर्वाधिक नावनोंदणी झाली आहे.
तरुणांच्या संख्येत वाढ
या आकडेवारीनुसार, जूनमध्ये सुमारे १०.१४ लाख नवीन सदस्यांची नोंदणी झाली आहे, जी ऑगस्ट २०२२ नंतरची सर्वाधिक आहे. नव्याने सामील झालेल्या सदस्यांमध्ये ५७.८७ टक्के हे १८-२५ वयोगटातील आहेत. पेरोल डेटानुसार, सुमारे १२.६५ लाख सदस्य बाहेर पडले आहेत, परंतु EPFO मध्ये पुन्हा बरेच जण सामील झाले आहेत.
हेही वाचाः इंटेलमध्ये १४० कर्मचाऱ्यांना नारळ, नवी नोकरभरतीही रोखणार; काय आहे कारण?
महिलांच्या संख्येत वाढ
दुसरीकडे लिंगनिहाय आकडेवारी पाहिल्यास १०.१४ लाख नवीन सदस्यांपैकी सुमारे २.८१ लाख नवीन महिला आहेत, ज्या पहिल्यांदाच EPFO मध्ये सामील झाल्या आहेत. नवीन महिला सदस्यांची टक्केवारी गेल्या ११ महिन्यांत सर्वाधिक आहे. तसेच जूनमध्ये एकूण ३.९३ लाख महिला EPFO मध्ये सामील झाल्या, जे ऑगस्ट २०२२ नंतरचे सर्वाधिक आहे.
हेही वाचाः कंपन्यांच्या CEO पदावर पुरुषांची मक्तेदारी? महिला अधिकाऱ्यांची संख्या घटली; नेमकं कारण काय?
राज्यांमध्ये महाराष्ट्र आघाडीवर
दुसरीकडे राज्यनिहाय पाहिले तर महाराष्ट्र, तामिळनाडू, कर्नाटक, गुजरात आणि हरियाणा या ५ राज्यांमध्ये सर्वाधिक सदस्य आहेत. १०.८० लाख सदस्यांपैकी ६०.४० टक्के सदस्य या राज्यांतील आहेत. दुसरीकडे महाराष्ट्र जून महिन्यात २०.५४ टक्के सदस्य जोडून आघाडीवर आहे.