मुंबई: देशाअंतर्गत भांडवली बाजारात सूचिबद्ध असलेल्या कंपन्यांचे मूल्यांकन ३६१.३१ लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे. जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेल्या देशाच्या भांडवली बाजाराने जागतिक पातळीवर सर्वाधिक मूल्य असलेल्या बाजारांमध्ये पाचवे स्थान कायम राखले असून, २०२३ बाजाराचे मूल्यांकन विक्रमी २४.८ टक्क्यांनी वाढून ४.३५ लाख कोटी डॉलरवर पोहोचले आहे.
विद्यमान वर्ष २०२३ मध्ये, सेन्सेक्स आणि निफ्टी या मुख्य निर्देशांकांनी अनुक्रमे १७.३ टक्के आणि १८.५ टक्के वाढ नोंदवली, तर बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांक ४३ टक्के आणि ४६ टक्क्यांनी वधारले.
हेही वाचा – बँकांवरील अवलंबित्व कमी करा, बँकेतर वित्तीय कंपन्यांना रिझर्व्ह बँकेच्या सूचना
अमेरिकी भांडवली बाजार ५०.३५ लाख कोटी डॉलर मूल्यांकनासह आघाडीवर आहे. त्याने विद्यमान वर्षात २२.६१ टक्क्यांचा विस्तार साधला आहे. डाऊ जोन्स इंडस्ट्रियल ॲव्हरेज निर्देशांक वर्षभरात १२.८ टक्क्यांनी वधारला. तर चीनचे भांडवली बाजार १०.५७ लाख कोटी डॉलरसह दुसऱ्या स्थानावर आहे. मात्र विद्यमान वर्षात चीनच्या भांडवली बाजारात ८.८१ टक्क्यांची घसरण झाली. इतर आशियाई बाजारांमध्ये, जपानचे बाजार भांडवल ११.६ टक्क्यांनी वाढून ६.०६ लाख कोटी डॉलर झाले, तर हाँगकाँगच्या बाजार भांडवलात अंदाजे १२.६ टक्के घसरून ४.५६ लाख कोटी डॉलरवर आले. वर्ष २०२३ मध्ये हाँगकाँगचा प्रमुख निर्देशांक हँग सेंग आतापर्यंत १७.४ टक्क्यांनी घसरला आहे.
युरोपमध्ये, फ्रान्स भांडवली बाजाराचे मूल्य १३.७७ टक्क्यांनी वाढून ३.२७ लाख कोटी डॉलर, तर ब्रिटनच्या बाजाराचे मूल्यांकन ५.३ टक्क्यांनी वाढून ३.०७ लाख कोटी डॉलरवर पोहोचले आहे. सौदी अरेबिया, कॅनडा आणि जर्मनीच्या बाजार भांडवलात अनुक्रमे १३.१ टक्के, ६.६३ टक्के आणि १२.२५ टक्क्यांनी वाढ झाली, जे अनुक्रमे २.९७ लाख कोटी डॉलर, २.८९ लाख कोटी डॉलर आणि २.३९ लाख कोटी डॉलरवर पोहोचले.