वृत्तसंस्था, नवी दिल्ली : रिझव्र्ह बँकेने बुधवारी रेपो दरात ०.३५ टक्क्यांची वाढ केल्यांनतर, त्याला ताबडतोब प्रतिसाद म्हणून सार्वजनिक आणि खासगी क्षेत्रातील बँकांनी कर्जावरील व्याजदर वाढविण्यास सुरुवात केली आहे. गुरुवारी सार्वजनिक क्षेत्रातील आघाडीच्या बँक ऑफ इंडिया आणि इंडियन ओव्हरसीज बँकेने ‘एमसीएलआर’ आणि ‘रेपो दरा’सारख्या बाह्य मानदंडावर आधारित (ईबीएलआर) कर्जे महाग करत असल्याची घोषणा केली. याचा नवीन तसेच चालू स्थितीतील अशा दोन्ही प्रकारच्या कर्जदारांना फटका बसणार आहे.
बँक ऑफ इंडियाने निधीसाठी खर्चावर आधारित कर्ज व्याजदर (एमसीएलआर) ०.२५ टक्क्याने वाढवला आहे. सर्वसाधारणपणे ‘एमसीएलआर’चे दर एक ते तीन वर्षांसाठी निश्चित करण्यात आलेले असतात. तसेच बँकेने रेपो दराशी संलग्न ‘ईबीएलआर’ आधारित व्याज दरांमध्ये ०.३५ टक्क्याची वाढ केली असून तो आता ९.१० टक्के करण्यात आला आहे. यामुळे आधार दराने (बेस रेट) कर्ज घेणाऱ्या ग्राहकांच्या कर्जाच्या हप्तय़ांतदेखील वाढ होणार आहे. हा दर मुख्यत्वे रिझव्र्ह बँकेच्या पतधोरणावर अवलंबून आणि रेपो दरातील फेरबदलानुसार परिवर्तित होत असतो. सुधारित वाढीव दर येत्या १० डिसेंबरपासून लागू करण्यात आले आहेत.
एक वर्ष मुदतीचा कर्जदर ०.२५ टक्के वाढवण्यात आला आहे. तो आता ७.९५ टक्क्यांवरून वाढून ८.१५ टक्क्यांवर पोहोचला आहे. तर सहा महिने मुदतीचा कर्ज व्याजदर आता ७.९० टक्क्यांपर्यंत वाढला आहे. गेल्या महिन्यात तो ७.६५ टक्के होता. इंडियन ओव्हरसीज बँकेने ‘एमसीएलआर’वर आधारित कर्ज व्याजदर ०.१५ ते ०.३५ टक्क्यांदरम्यान वाढविला आहे. ‘एमसीएलआर’वर आधारित एक दिवस मुदतीच्या कर्जावरील व्याजदर आता ७.६५ टक्क्यांवर गेला आहे. याचप्रमाणे एक वर्ष मुदतीचा कर्जदर ०.२० टक्के वाढीसह ८.२५ टक्क्यांवर पोहोचला आहे. तर दोन वर्षे मुदतीचे कर्ज व्याजदर ०.२५ टक्क्यांनी वाढून आता ८.३५ टक्क्यांपर्यंत वाढला आहे. तर तीन वर्षांसाठी कर्जदर ३० टक्क्यांनी वाढून ८.४० टक्क्यांवर पोहोचला आहे.
रेपो दर ६.५ टक्क्यांपर्यंत वाढू शकेल – उदय कोटक
नवी दिल्ली : रिझव्र्ह बँकेने बुधवारी कर्जे महाग करणारी ०.३५ टक्क्यांची दरवाढ केल्यानंतर, कोटक महिंद्रा बँकेचे व्यवस्थापकीय संचालक उदय कोटक यांनी मध्यवर्ती बँकेकडून महागाई दर खाली आणण्यासाठी आणखी एक दरवाढ केली जाऊ शकते, असे गुरुवारी प्रतिपादन केले. भारतीय उद्योग महासंघ अर्थात सीआयआयद्वारे आयोजित ‘ग्लोबल इकॉनॉमिक पॉलिसी समिट’ परिषदेत बोलताना कोटक म्हणाले, माझ्या मतानुसार आणखी एक दर वाढ होऊ शकते आणि त्यानुसार रेपो दर ६.५ टक्क्यांवर जाऊ शकेल. अर्थात बाह्य जग, तेलाच्या किमतीचे काय होते याच्या अधीन हा निर्णय असेल, अशी पुस्तीही त्यांनी जोडली. अमेरिकी फेडरल रिझव्र्हचा येत्या आठवडय़ातील व्याजदराचा निर्णय जगभरातील इतर मध्यवर्ती बँकांसाठी संकेत असेल, असेही ते म्हणाले.