Aadhaar Data Lea : डार्क वेबवर आधार डेटा लीकचे एक मोठे प्रकरण समोर आले आहे. बिझनेस स्टँडर्डच्या रिपोर्टनुसार, ८१.५ कोटी भारतीयांचा आधार आणि पासपोर्ट संबंधित डेटा डार्क वेबवर लीक झाला आहे, असं अमेरिकन कंपनी रिसिक्युरिटीचा दावा आहे. नाव, फोन नंबर, पत्ता, आधार आणि पासपोर्टशी संबंधित माहिती ऑनलाइन विकण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे रिपोर्टमध्ये म्हटले आहे.
अमेरिकन फर्मने आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, ९ ऑक्टोबर रोजी ‘pwn0001’ या व्यक्तीने ब्रीच फोरमवर एक पोस्ट शेअर केली. त्यांनी ८१.५ कोटी भारतीयांच्या आधार आणि पासपोर्टशी संबंधित रेकॉर्डशी संबंधित माहिती दिली आणि ती विकण्याचा प्रयत्न केला. सुरक्षा रिपोर्टनुसार, त्या व्यक्तीने आधार आणि पासपोर्टशी संबंधित माहिती ८० हजार डॉलरमध्ये विकण्याची ऑफर दिली होती.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, डेटा लीक इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) कडून झालेला असू शकतो. ICMR ने अद्याप यावर कोणतेही उत्तर दिलेले नाही. pwn0001 द्वारे शोधलेल्या या डेटा लीकची सीबीआय चौकशी करत असल्याचे रिपोर्टमध्ये म्हटले आहे.
ट्विटरवर (X) वरसुद्धा हॅकर्सने माहिती दिली आहे. भारतातील सर्वात मोठा डेटा लीक म्हणजे हॅकर्सनी ८० कोटींहून अधिक भारतीयांचा खासगी डेटा लीक केला आहे. लीक झालेल्या डेटामध्ये नाव, वडिलांचे नाव, फोन नंबर, पासपोर्ट नंबर, आधार क्रमांक आणि वयाची माहिती आहे. मात्र, आतापर्यंत या डेटा लीक प्रकरणावर सरकारकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.
तसेच ऑगस्टमध्ये लुसियस नावाच्या आणखी एका व्यक्तीने ब्रीच फोरमवर १.८ टेराबाइट डेटा विकण्याची ऑफर दिली होती. एप्रिल २०२२ मध्ये ब्रुकिंग्सच्या अहवालानुसार, नियंत्रक आणि महालेखा परीक्षकांनी UIDAI ची तपासणी केली होती आणि असे आढळून आले की, प्राधिकरणाने त्यांच्या ग्राहक विक्रेत्यांचे प्रभावीपणे नियमन केले नाही आणि त्यांच्या डेटा व्हॉल्टच्या सुरक्षिततेचे संरक्षण केले नाही. उल्लेखनीय म्हणजे याआधीही डेटा लीकचे प्रकरण समोर आले होते. जूनमध्ये CoWin वेबसाइटवरून VVIP सह लसीकरण झालेल्या नागरिकांचा वैयक्तिक डेटा टेलिग्राम मेसेंजर चॅनेलद्वारे कथितपणे लीक झाल्यानंतर सरकारने तपास सुरू केला होता.