मुंबई : गृहवित्त क्षेत्रातील आधार हाऊसिंग फायनान्सची विक्री येत्या ८ मेपासून सुरू होणार असून १० मेपर्यंत गुंतवणूकदारांना आयपीओसाठी अर्ज करता येईल. कंपनीने या भागविक्रीसाठी ३०० ते ३१५ रुपयांचा किंमतपट्टा निश्चित केला आहे.
येत्या ७ मे रोजी सुकाणू गुंतवणूकदारांना आयपीओसाठी बोली लावता येईल. आयपीओच्या माध्यमातून कंपनीचा ३,००० कोटी रुपयांचा निधी उभारणीचा मानस आहे. १,००० कोटी रुपये मूल्याच्या नवीन समभागांची विक्री करण्यात येईल. तर विद्यमान प्रवर्तकांच्या मालकीच्या आंशिक समभाग विक्रीच्या (ओएफएस) माध्यमातून २,००० कोटी रुपये उभारण्यात येणार आहेत. ब्लॅकस्टोन समूहाची संलग्न कंपनी असलेल्या बीसीपी टॉप्को कंपनी ओएफएसद्वारे समभाग विक्री करणार आहे. बीसीपी टॉप्कोची आधार हाउसिंग फायनान्समध्ये ९८.७२ टक्के हिस्सेदारी आहे, तर खासगी क्षेत्रातील आघाडीच्या आयसीआयसीआय बँकेकडे उर्वरित १.१८ टक्के हिस्सेदारी आहे.
हेही वाचा >>> Googleने कोअर टीममधील ‘इतक्या’ कर्मचाऱ्यांना दिला नारळ, पण भारतीयांसाठी सुवर्णसंधी!
समभाग विक्रीतून उभारण्यात येणाऱ्या एकूण निधीपैकी ७५० कोटी रुपये भविष्यातील भांडवली गरजा पूर्ण करण्यासाठी वापरला जाणार आहे. आयपीओमधील ५० टक्के समभाग पात्र संस्थात्मक खरेदीदारांसाठी, ३५ टक्के किरकोळ गुंतवणूकदारांसाठी आणि उर्वरित १५ टक्के समभाग बिगरसंस्थागत गुंतवणूकदारांसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत. आधार हाऊसिंग फायनान्स तारण-आधारित कर्जे वितरित करते, ज्यामध्ये निवासी मालमत्ता खरेदी आणि बांधकामासाठी कर्ज समाविष्ट आहे. गृह सुधार आणि विस्तार कर्ज; आणि व्यावसायिक मालमत्ता बांधकाम आणि संपादनासाठी कर्जदेखील ती देते. आर्थिकदृष्ट्या कमकुवत आणि अल्प-मध्यम-उत्पन्न ग्राहकांना सेवा देते. ३० सप्टेंबर २०२३ अखेरपर्यंत कंपनी ९१ कार्यालयांसह ४७१ शाखा हाताळते.