लोकसत्ता व्यापार प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुंबई : ‘पेटीएम पेमेंट्स बँके’वर केलेल्या कारवाईने सामान्य ग्राहकांनी काळजी करण्याचे कारण नसून केवळ बँकेकडून नियमांचे उल्लंघन आणि अनियमितता आढळल्याने हे पाऊल उचलले गेले, असे रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी गुरुवारी स्पष्ट केले. मात्र रिझर्व्ह बँकेने ‘पेटीएम पेमेंट्स बँके’तील नेमक्या उणिवा आणि अनियमितता स्पष्ट करण्यास नकार दिला.

रिझर्व्ह बँक द्विपक्षीय आधारावर संस्थांसोबत काम करते, त्यांना पुरेसा वेळ देऊन नियमांचे पालन करण्यास उद्युक्त करते आणि जेव्हा संस्था आवश्यक कृती करत नाही तेव्हाच व्यवसायावर निर्बंध किंवा तत्सम कारवाई करते. शिवाय वारंवार सूचना देऊन देखील संस्था नियमांचे पालन करत नसल्यास आम्ही व्यवसायावर निर्बंध लादतो. रिझर्व्ह बँकेची कृती ही त्या परिस्थितीच्या गंभीरतेच्या प्रमाणानुसार असते, असे दास यांनी स्पष्ट केले. ग्राहकांच्या हिताच्या संरक्षणासाठी आणि प्रणालीगत स्थिरता राखण्यासाठी रिझर्व्ह बँक काम करते.

हेही वाचा >>>पेटीएमची रिझर्व्ह बँकेच्या निर्णयाबाबत मोठी भूमिका

देशाच्या डिजिटल वित्तीय व्यवहारांच्या क्षेत्रातील अग्रणी ‘पेटीएम’च्या व्यवहारांवर प्रक्रिया करणाऱ्या ‘पेटीएम पेमेंट्स बँके’वर गेल्या आठवड्यात बुधवारी रिझर्व्ह बँकेने कारवाईचा बडगा उगारला. त्यामुळे बँकेवर येत्या २९ फेब्रुवारीपासून नवीन ठेवी स्वीकारण्यावर निर्बंध आले आहेत, तसेच अनेक प्रकारच्या सेवांसाठी नव्याने ग्राहकही तिला नोंदवता येणार नाही.

समभागात १० टक्क्यांची घसरण

गुरुवारच्या सत्रात पेटीएमचा (वन ९७ कम्युनिकेशन्स) समभाग १० टक्क्यांच्या खालच्या सर्किट मर्यादेपर्यंत घसरला. सलग दोन सत्रातील तेजीनंतर पुन्हा पेटीएमच्या समभागाला घसरण कळा लागल्याने कंपनीचे बाजारमूल्य एका सत्रात ३,१५३.१० कोटींनी घसरून २८,३९४.४४ कोटींपर्यंत खाली आले. दिवसअखेर समभाग ४९.६६ रुपयांच्या घसणीसह ४४६.६५ रुपयांवर बंद झाला.

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Action against paytm payments bank keeping in mind the customer interest print eco news amy