पीटीआय, नवी दिल्ली
देशातील निर्मिती क्षेत्रासाठी सरलेला फेब्रुवारी महिना सुस्थितीचा राहिला. नवीन मागणी आणि उत्पादनातील वाढ यामुळे निर्मिती क्षेत्रातील वाढ कायम राहिली, असे बुधवारी मासिक सर्वेक्षणातून पुढे आले. निर्मिती क्षेत्रातील खरेदी व्यवस्थापकांमध्ये पार पडलेल्या सर्वेक्षणाच्या आधारे, ‘एस अॅण्ड पी ग्लोबल इंडिया’ने जाहीर केलला ‘पीएमआय’ निर्देशांक फेब्रुवारी महिन्यात ५५.३ गुणांवर नोंदवण्यात आला. जानेवारीच्या तुलनेत त्यात किंचित घट झाली आहे. जानेवारीत तो ५५.४ गुणांवर नोंदवण्यात आला होता.
फेब्रुवारीतील सर्वेक्षणानुसार, या महिन्यात सर्व क्रियाकलाप स्थितीत सुधारणा दिसून आली. सलग २० व्या महिन्यात ५० पेक्षा जास्त गुणांक नोंदीसह दिसून आलेली ही सुधारणा आहे. तथापि, सर्वेक्षणात सहभागी झालेल्या ९८ टक्के व्यवस्थापकांनी रोजगारात कोणतीही वाढ झाली नसल्याचे मत नोंदवले. यामुळे रोजगार निर्मितीच्या बाबतीत फेब्रुवारी महिन्यात अपयशी कामगिरी झाल्याचे स्पष्ट होत आहे. सध्या कंपन्यांकडे पुरेसे मनुष्यबळ असल्याने नवीन कामगार भरती कमी आहे.
हेही वाचा – वित्तीय तूट दहा महिन्यांत ११.९ लाख कोटी रुपयांवर; वार्षिक अंदाजाच्या ६७.८ टक्क्यांवर
हेही वाचा – विकासदर डिसेंबर तिमाहीत ४.४ टक्क्यांवर; सलग दुसऱ्या तिमाहीत घसरण
आर्थिक वर्षाची शेवटची तिमाही असल्याने नवीन कामांची मागणी वाढली आहे. देशांतर्गत बाजारपेठेतून मागणी वाढली असून, त्या तुलनेत आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील मागणी कमी प्रमाणात वाढली आहे. आंतरराष्ट्रीय विक्री कमी झाली आहे. फेब्रुवारी महिन्यात आंतरराष्ट्रीय विक्रीचा विस्तार मागील ११ महिन्यांतील सर्वांत कमकुवत राहिला.