Ambuja-Sanghi Cements Deal : अदाणी ग्रुपने आणखी एक मोठा करार पूर्ण केला आहे. अदाणी समूहाच्या अंबुजा-एसीसी सिमेंट कंपनीने सांघी सिमेंट्स (Sanghi Industries)चे अधिग्रहण केले आहे. अंबुजा सिमेंट्स लिमिटेड (ACL) ने आज संघी इंडस्ट्रीज लिमिटेड (SIL) चे ५००० कोटींमध्ये अधिग्रहण करण्याची घोषणा केली. अंबुजा सिमेंटने सांघी सिमेंट्समधील ५६.७४ टक्के हिस्सा खरेदी केला आहे. दरम्यान, सांघी सिमेंटचे शेअर्स गुरुवारी ५ टक्क्यांच्या वरच्या सर्किटवर आले आहेत. कंपनीचे शेअर्स सुरुवातीच्या व्यवहारात १०५.४० रुपयांवर व्यवहार करीत होते. अंबुजा सिमेंट आणि एसीसी या दोन्ही कंपन्यांचे शेअर्स किरकोळ वधारले आहेत. अमेरिकन रिसर्च आणि इन्व्हेस्टमेंट कंपनी हिंडेनबर्ग रिसर्चने जानेवारीमध्ये जारी केलेल्या अहवालात आर्थिक फसवणुकीच्या आरोपानंतर हा करार अदाणी समूहाचा पहिला मोठा करार आहे.
कंपनीने काय सांगितले?
कंपनीने गुरुवारी जारी केलेल्या एका निवेदनात म्हटले आहे की, संपादनासाठी संपूर्णपणे अंतर्गत संसाधनांमधून वित्तपुरवठा केला जाणार आहे. संघी इंडस्ट्रीज लिमिटेड(SIL) ची क्लिंकर क्षमता प्रतिवर्ष ६.६ दशलक्ष टन आहे. तसेच कंपनीची सिमेंट क्षमता वार्षिक ६१ लाख टन आहे. याशिवाय कंपनीकडे एक अब्ज टन चुनाखडीचा साठा आहे. अल्ट्राटेक सिमेंटनंतर अदाणी समूह हा दुसरा सर्वात मोठा सिमेंट उत्पादक आहे. त्याची एकत्रित क्षमता ६५ दशलक्ष टनांपेक्षा जास्त सिमेंट उत्पादनाची आहे आणि संपूर्ण भारतात डझनाहून अधिक उत्पादन कारखाने आहेत. दुसरीकडे गुजरातची आघाडीची कंपनी सांघीची वार्षिक उत्पादन क्षमता ६.१ दशलक्ष मेट्रिक टन आहे.
हेही वाचाः विश्लेषण : ऑनलाइन गेमिंग, कॅसिनो आणि हॉर्स रेसिंगवर जीएसटी परिषदेत पुन्हा चर्चा होण्याची शक्यता
या संपादनानंतर अंबुजा सिमेंटची क्षमता वार्षिक ७३.६ दशलक्ष टन होणार आहे. कंपनीने २०२८ पर्यंत वार्षिक १४० दशलक्ष टन सिमेंट क्षमतेचे उद्दिष्ट नियोजित वेळेपूर्वी गाठले असल्याचे सांगितले. अंबुजा सिमेंट म्हणाली, “आम्ही एसआयएलला देशातील सर्वात कमी किमतीत क्लिंकर उत्पादक बनवण्याचे ध्येय ठेवले आहे. अंबुजा सांघीपुरमची सिमेंट क्षमता पुढील दोन वर्षांत १५ दशलक्ष टनांपर्यंत वाढवेल.
अंबुजा त्रैमासिक निकाल
अदाणी समूहाच्या अंबुजा सिमेंट्सने जून २०२३ ला संपलेल्या तिमाहीत ६४४.८८ कोटींचा नफा नोंदवला आहे, जो एका वर्षापूर्वीच्या १०४८.७८ कोटींपेक्षा ३८.५ टक्के कमी आहे. कंपनीचा जून तिमाहीतील कामकाजातील महसूल वार्षिक आधारावर ३,९९८.२६ कोटींवरून १८.४ टक्क्यांनी वाढून ४,७२९.७ कोटी झाला आहे. आर्थिक वर्ष २०२४ च्या एप्रिल-जून तिमाहीत अंबुजा सिमेंटच्या स्टँडअलोन विक्रीचे प्रमाण गेल्या वर्षीच्या याच कालावधीतील ७.४ दशलक्ष टनांवरून ९.१ दशलक्ष टन इतके वाढले आहे.