Adani Cement Biz : देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि प्रमुख उद्योगपतींपैकी एक असलेले गौतम अदाणी सिमेंट उद्योगात नवा धमाका करण्याची शक्यता आहे. सिमेंट उद्योगात पदार्पण केल्यानंतर लवकरच पहिल्या रांगेत पोहोचू इच्छिणाऱ्या गौतम अदाणी यांना नव्या कराराची संधी मिळू शकते. जर हा करार झाला तर गौतम अदाणी आणि त्यांच्या अदाणी समूहाची सिमेंट उद्योगातील उपस्थिती पूर्वीपेक्षा अधिक मजबूत होणार आहे.
ओरिएंट सिमेंटकडून ऑफर मिळाली
ईटीच्या रिपोर्टनुसार, अदाणी समूहाला ओरिएंट सिमेंटकडून ऑफर मिळाली आहे. उद्योगपती सीके बिर्ला यांनी ओरिएंट सिमेंटमधील त्यांचा हिस्सा विकण्यासाठी गौतम अदाणी यांच्याशी संपर्क साधला आहे. यापूर्वी सीके बिर्ला यांना इतर कंपन्यांकडून ऑफर मिळाल्या होत्या, परंतु मूल्यांकनावर एकमत नसल्यामुळे त्या नाकारण्यात आल्या होत्या.
हेही वाचाः टाटांच्या एअर इंडिया एक्सप्रेसचा नवा अवतार उघड, आता ‘अशी’ दिसणार एअरलाइन्स
अदाणी हा मोठा करार करण्याची शक्यता
अदाणी समूह आणि ओरिएंट सिमेंट यांच्यातील करार निश्चित झाल्यास काही महिन्यांतच सिमेंट उद्योगातील हा एक नवा मोठा करार ठरणार आहे. याआधीही अदाणी यांनी एक करार केला होता, ज्याने सिमेंट उद्योगातील समतोल बदलला होता, जेव्हा अदाणी समूहाने होलसीमचा भारतीय व्यवसाय विकत घेतला होता. अदाणी आणि होलसीम यांच्यातील करार गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये पूर्ण झाला होता. १० अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त किमतीच्या करारात ACC आणि अंबुजा सिमेंट अदाणी समूहाचा भाग झाला होता. त्यानंतर अदाणी समूहाने सांघी इंडस्ट्रीजच्या सिमेंट व्यवसायाचे अधिग्रहण यंदा ऑगस्टमध्ये पूर्ण केले आहे.
हेही वाचाः विप्रोच्या ५ उपकंपन्यांचे अस्तित्व संपुष्टात येणार; मूळ कंपनीने विलीनीकरणाची केली घोषणा
अदाणींपुढे आता फक्त एकच नाव
सिमेंट उद्योगाबद्दल बोलायचे झाल्यास सध्या भारतात फक्त अल्ट्राटेक सिमेंट अदाणी ग्रुपच्या पुढे आहे. अल्ट्राटेक सिमेंटची सध्या वार्षिक उत्पादन क्षमता १४० दशलक्ष टन आहे, तर अदाणी ७० दशलक्ष टन वार्षिक उत्पादन क्षमतेसह दुसऱ्या स्थानावर आहे. २०२८ पर्यंत सिमेंटचे एकूण उत्पादन दरवर्षी १४० दशलक्ष टनांपर्यंत वाढवण्याची अदाणी समूहाची योजना आहे. ओरिएंट सिमेंटचे अधिग्रहण करण्याचा करार अदाणींना हे लक्ष्य साध्य करण्यास फायदेशीर ठरू शकतो.
बाजारपेठांमध्ये ओरिएंटचा वाटा किती?
जर आपण संपूर्ण देशातील सिमेंट उद्योगावर नजर टाकली तर अल्ट्राटेक आणि अदाणी व्यतिरिक्त जी के सिमेंट आणि श्री सिमेंट यांसारख्या कंपन्या देखील सिमेंट उद्योगात पहिल्या रांगेत आहेत. ओरिएंट सिमेंटकडे बघितले तर अनेक राज्यांमध्ये त्यांचा बाजारपेठेत मोठा वाटा आहे. कंपनीची महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि कर्नाटकमध्ये मोठी भागीदारी आहे. मध्य प्रदेश, तामिळनाडू, केरळ, गुजरात आणि छत्तीसगडमध्येही कंपनीची चांगली भागीदारी आहे. सध्या कंपनीची एकूण क्षमता वार्षिक सुमारे ८ दशलक्ष टन सिमेंट उत्पादनाची आहे. अदाणी समूहाच्या अंबुजा सिमेंटने विकत घेतलेल्या सांघी इंडस्ट्रीजच्या वार्षिक क्षमतेपेक्षा हे प्रमाण ६.१ दशलक्ष टन अधिक आहे. परंतु आतापर्यंत या प्रस्तावित कराराबद्दल अदाणी समूहाने कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही किंवा ओरिएंट सिमेंटने कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.