पीटीआय, नवी दिल्ली
एसीसी आणि अंबुजा सिमेंट ताब्यात घेण्यासाठी अदानी सिमेंटने ३.५ अब्ज डॉलरचे कर्ज घेतले होते. या कर्जाची पुनर्रचना करण्यात आल्याचे अदानी सिमेंटने शुक्रवारी जाहीर केले. आंतरराष्ट्रीय पातळीवरील १० बँकांनी या कर्जाची पुनर्रचना केली असल्याने अदानी समूहावर आंतरराष्ट्रीय संस्थांचा विश्वास वाढत असल्याचा दावा करण्यात आला आहे.
अदानी सिमेंटने म्हटले आहे की, या ३.५ अब्ज डॉलरच्या कर्ज पुनर्रचना कार्यक्रमात आंररराष्ट्रीय बँकांचे ३ वर्षांपर्यंतच्या मुदतीच्या कर्जाचा समावेश आहे. समूहातील कंपन्यांना भक्कम पाठिंबा मिळत असून, भांडवलपुरवठा होत आहे. जागतिक वित्तीय बाजारपेठेत अदानी समूहाला असलेली स्वीकारार्हताही यातून समोर येत आहे. वित्तीय स्थिरता आणि विकासासाठी आमची कटिबद्धताही समोर आली आहे. या कर्ज पुनर्रचनेमुळे आमच्या खर्चात ३० कोटी डॉलरची बचत होणार आहे.
हेही वाचा… आयपीओ’ प्रक्रियेला वेग; विद्यमान वर्षात ८०,००० कोटी रुपयांची निधी उभारणी शक्य
हेही वाचा… व्याजदर कपात तूर्त नाहीच; रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांचे स्पष्टीकरण
अदानी सिमेंटने गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात अंबुजा आणि एसीसी या सिमेंट कंपन्या ६.६ अब्ज डॉलरला ताब्यात घेतल्या. यामुळे अदानी सिमेंट देशातील दुसऱ्या क्रमांकाची मोठी सिमेंट कंपनी बनली. अंबुजा सिमेंट आणि एसीसी यांची एकत्रित वार्षिक सिमेंट उत्पादन क्षमता ६.७ कोटी टन आहे. संघी सिमेंट ताब्यात घेऊन उत्पादन क्षमता २०२५ पर्यंत १० कोटी टनावर नेण्याचे अदानी सिमेंटचे उद्दिष्ट आहे.