मुंबई: अदानी समूहातील आघाडीची कंपनी असलेल्या अदानी एंटरप्रायझेस लिमिटेडने सरलेल्या सप्टेंबर तिमाहीअखेर निव्वळ नफ्यात आठ पटीने वाढ नोंदवल्याचे मंगळवारी जाहीर केले. विमानतळ व्यवस्थापन आणि अक्षय्य ऊर्जा या व्यवसायांतील कमाईतून, कंपनीने पारंपरिक कोळसा क्षेत्रात झालेली घसरण भरून काढली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जुलै-सप्टेंबर तिमाहीमध्ये कंपनीने १,७४१ कोटी रुपयांचा निव्वळ नफा नोंदवला आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत बँकेने २२८ कोटी रुपयांच्या नफ्याची नोंद केली होती. त्यातुलनेत यंदा नफ्यात तब्बल ६६३ टक्क्यांची वाढ झाली आहे, असे कंपनीच्या निवेदनात म्हटले आहे. करपूर्व ढोबळ नफा ४६ टक्क्यांनी वाढून ४,३५४ कोटी रुपये, तर महसूल १५ टक्क्यांनी वाढून २३,१९६ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. कोळसा व्यवसाय वगळता, इतर मुख्य व्यवसायांमध्ये वाढ झाली आहे.

हेही वाचा : रिझर्व्ह बँकेच्या सुवर्णसाठ्यात १०२ टनांची भर

u

अदानी न्यू इंडस्ट्रीज लिमिटेड या सौर वीजनिर्मितीसाठी मॉड्यूल्स आणि विंड टर्बाइन उत्पादन करणाऱ्या कंपनीच्या करपूर्व नफ्यात ७८ टक्क्यांनी वाढ होऊन तो १,१२१ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. तर विमानतळ व्यवसायातील कमाई ३१ टक्क्यांनी वाढून ७४४ कोटी रुपयांवर पोहोचली आहे. दोन्ही व्यवसायांच्या उत्पन्नात भरघोस वाढ झाल्याने एकंदर कंपनीच्या नफ्यात ८ पटींनी वाढ झाली आहे.

हेही वाचा : Gold Price Today : धनत्रयोदशीच्या दिवशी सोन्याचा दर किती? जाणून घ्या, सोने चांदीचा भाव एका क्लिकवर

सप्टेंबर तिमाहीत खाण सेवा क्षेत्राने ६५ टक्क्यांनी वाढ नोंदवून नफा ४०० कोटींवर पोहोचला आहे. तर महसुलात घट झाल्याने कोळसा व्यापार विभागाची कमाई २,०६३ कोटींवरून १,९१६ कोटी रुपयांवर घसरली आहे. कंपनीने चालू महिन्यात पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांना समभाग विक्री करून ४,२०० कोटींची निधी उभारणी केली आहे.

अदानी एंटरप्रायझेस लिमिटेड ही लॉजिस्टिक्स, ऊर्जा आणि देशाच्या आर्थिक वाढीचा केंद्रबिंदू असलेल्या संलग्न क्षेत्रांमध्ये गुंतवणूक करण्यावर लक्ष केंद्रित करत आहे. या विक्रमी कामगिरीचे नेतृत्व अदानी न्यू इंडस्ट्रीज लिमिटेडने केले असून अदानी एअरपोर्ट होल्डिंग्स लिमिटेड तिच्या क्षमतेत वाढ करत आहे, असे अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी म्हणाले.

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Adani enterprises profit increased by 8 times increased to rupees 1741 crores print eco news css