नवी दिल्ली : अदानी समूहातील प्रमुख कंपनी असलेल्या अदानी ग्रीन एनर्जीमध्ये गौतम अदानी आणि त्यांचे कुटुंबीय म्हणजेच प्रवर्तक समूहाकडून ९,३५० कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार आहे. वर्ष २०३० पर्यंत ४५ गिगावॉट स्थापित क्षमतेचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आणि कंपनीची देणी चुकती करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
हेही वाचा >>> बाजार मूल्यांकनात वार्षिक २५ टक्क्यांची विक्रमी वाढ
अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेडच्या संचालक मंडळाने मंगळवारी आर्डोर इन्व्हेस्टमेंट होल्डिंग लिमिटेड आणि अदानी प्रॉपर्टीज प्रायव्हेट लिमिटेड या प्रवर्तक समूहातील कंपन्यांना प्रत्येकी १,४८०.७५ रुपये दराने ६.३१ कोटी वॉरंट देण्याच्या योजनेला मंजुरी दिली. या गुंतवणुकीमुळे कंपनीतील ३.८३ टक्के भागभांडवल हिस्सेदारी ही प्रवर्तक समूह कंपन्यांना मिळेल. अदानी ग्रीन एनर्जीमध्ये प्रस्तावित ९,३५० कोटी रुपयांची गुंतवणूक भांडवली खर्चासाठी वापरली जाणार आहे. मंगळवारच्या सत्रात राष्ट्रीय शेअर बाजारात अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेडचा समभाग ४.३८ टक्क्यांनी वधारून १,६००.२० रुपयांवर स्थिरावला. सध्याच्या समभागांच्या बाजारभावानुसार, कंपनीचे २.५३ लाख कोटींचे बाजार भांडवल आहे.