पीटीआय, नवी दिल्ली
अदानी समूहाचे सर्वेसर्वा गौतम अदानी यांनी बाजारातील कमकुवत परिस्थितीमुळे १.२ अब्ज डॉलरची अदानी ग्रीनची नियोजित रोखे विक्री पुढे ढकलली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रोखे विक्री आता अमेरिकेतील निवडणुकांनंतर होण्याची शक्यता आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अक्षय्य ऊर्जा क्षेत्रातील कंपनी असलेली अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेडने येत्या मंगळवारी २० वर्षे मुदतीच्या रोख्यांची विक्री करणार होती. मात्र अखेरच्या क्षणी ती पुढे ढकलण्यात आली. अदानी ग्रीनने ‘फिच’ व ‘मूडीज्’कडून गुंतवणूकयोग्य (आयजी) मानांकन प्राप्त हायब्रिड रोखे विक्री करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र प्रतिकूल बाजार स्थिती पाहता, अपेक्षित किंमत आणि एकूण परिणाम साध्य करता येणार नसल्याचे कंपनीच्या लक्षात आले. परिणामी अमेरिकेतील अध्यक्षीय निवडणुका उरकल्यानंतर रोखे विक्री करण्याचा तिने निर्णय घेतला. प्रस्तावित रोखे विक्रीतून मिळणारी रक्कम परकीय चलन कर्जाची परतफेड करण्यासाठी वापरली जाणार होती.

हेही वाचा >>>बक्षीस समभागावर विप्रोकडून गुरुवारी निर्णय

याआधी अदानी समूहाला देशाच्या भांडवली बाजाराच्या इतिहासातील आजवरची सर्वात मोठी २०,००० कोटी रुपये उभे करणारी समभाग विक्रीदेखील गुंडाळावी लागली होती. हिंडेनबर्ग रिसर्चच्या अहवालात करण्यात आलेल्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर अदानी समूहाने बाजारातील अभूतपूर्व परिस्थिती आणि नकारात्मकता लक्षात घेऊन, सुरू झालेली विक्री ही अकस्मात मध्येच रद्द करण्याचा निर्णय घेतला होता.

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Adani green 1 2 billion dollar bond sale postponed print eco news amy