मुंबई : नामांकित उद्योगपती गौतम अदानी यांच्यासह सात अधिकाऱ्यांविरुद्ध कथित लाचखोरीप्रकरणी अमेरिकेत गुन्हा दाखल झाल्यानंतर समूहातील अक्षय्य ऊर्जा क्षेत्रातील कंपनी असलेल्या अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेडने ६० कोटी डॉलरची (५,०७० कोटी रुपये) रोखे विक्री योजना गुंडाळली आहे.
भारतातील काही राज्य सरकारांच्या अधिकाऱ्यांना सुमारे २६.५ कोटी डॉलरची (२,१०० कोटी रुपये) लाच देऊन, त्या बदल्यात ऊर्जा क्षेत्रातील कंत्राटे मिळवण्यात खुद्द गौतम अदानींसह, त्यांच्या सात अधिकाऱ्यांच्या भूमिकेसाठी अमेरिकी न्याय विभागाने त्यांना दोषी ठरविले आहे. अमेरिकेतील गुंतवणूकदारांना प्रभावित करणाऱ्या या कृत्यापासून त्यांना अंधारात ठेवल्याचा आरोपही अदानी समूहावर आहे. अदानी समूहाने या आरोपांना तथ्यहीन ठरवत फेटाळले असले तरी, गुरुवारी समूहाने २० वर्ष मुदतपूर्तीचे हरित रोख्यांच्या विक्री प्रक्रिया रद्दबातल करत असल्याचा निर्णय घेतला. गत दोन वर्षात या समूहावर दुसऱ्यांदा असा प्रसंग ओढवला आहे.
हेही वाचा :आरोपांचा अदानी समभागांना दणका
अदानी ग्रीन एनर्जीने रोखे विक्री सुरू केली होती. रोख्यांनी तीन पट अधिक भरणा करणारा प्रतिसादही मिळविला होता. मात्र अमेरिकी नियामकांनी न्यूय़ॉर्कमध्ये सूचिबद्ध कंपनीचा लाचखोरीत अदानींसह सहभाग आणि तिच्या फसवणुकीच्या उलाढालीसंदर्भात चौकशी सुरू केल्यांनतर अदानी समूहाने रोखे विक्री योजना रद्द करत असल्याचे गुरुवारी जाहीर केले.
अमेरिकेचा न्याय विभाग आणि तेथील बाजार नियामक ‘एसईसी’ यांनी गौतम अदानी आणि सागर अदानी यांच्या विरोधात फौजदारी आणि दिवाणी दावा दाखल केला असून संचालक मंडळातील विनीत जैन यांचाही आरोपी म्हणून समावेश केला आहे. या घडामोडींमुळेच सहाय्यक कंपन्यांनी प्रस्तावित हरित रोखे विक्री योजना पुढे ढकलली आहे, असे अदानी ग्रीन एनर्जीने बाजार मंचांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
हेही वाचा : जागतिक प्रतिकूलतेत, अदानींवरील लाचखोरीच्या गुन्ह्यांची भर
महिन्याभरापूर्वी अशाच प्रकारची रोखे विक्रीचा प्रयत्न करण्यात आला होता, मात्र काही गुंतवणूकदारांनी किमतींवर आक्षेप घेतल्यानंतर योजना पुढे ढकलून, ती अमेरिकेतील निवडणुकांपश्चात घेण्याचा निर्णय घेतला गेला. गेल्या वर्षीदेखील हिंडेनबर्ग रिसर्च केलेल्या आरोपांनंतर अदानी एंटरप्रायझेस लिमिटेडला त्यांची २०,००० कोटी रुपयांची महाकाय समभाग विक्री (‘एफपीओ’) मध्येच स्थगित करून रद्द करावी लागण्याची पाळी आली होती.
‘वेदान्त’ला अप्रत्यक्ष फटका
अदानी समूहानंतर वेदान्त रिसोर्सेसने देखील नियोजित डॉलरमधील रोखे विक्री गुरुवारी पुढे ढकलली. अदानी समूहावर करण्यात आलेल्या नवीन आरोपांमुळे भारतीय कंपन्यांसाठी कर्ज उभारणी महागण्याच्या शक्यतेने वेदान्त रिसोर्सेस रोखे विक्री योजना तूर्तास गुंडाळली आहे. साडेतीन वर्ष मुदतपूर्ती असलेल्या डॉलरमध्ये देय असलेल्या रोख्यांच्या माध्यमातून निधी उभारण्याचे समूहाची योजना होती. यासाठी वेदान्त समूहाने सिटीग्रुप, बार्कलेज, डॉइश बँक आणि स्टँडर्ड चार्टर्ड बँक यांना संयुक्त जागतिक समन्वयक आणि रोखे विक्रीच्या प्रधान व्यवस्थापक म्हणून नियुक्त केले होते.