नवी दिल्ली : सीके बिर्ला समूहाची ओरिएंट सिमेंट कंपनी ८,१०० कोटी रुपयांना ताब्यात घेण्याची घोषणा अदानी समूहाने मंगळवारी केली. अदानी समूहाकडून छोट्या सिमेंट कंपन्या ताब्यात घेऊन या क्षेत्रात वर्चस्व प्रस्थापित करण्याच्या दिशेने पावले उचलली जात आहेत.

अदानी समूहातील अंबुजा सिमेंट या कंपनीकडून ओरिएंटचे अधिग्रहण होत आहे. देशातील दुसऱ्या क्रमांकाची सिमेंट उत्पादक कंपनी असलेली अंबुजा सिमेंटकडून ओरिएंट सिमेंटमधील ४६.८ टक्के हिस्सा विकत घेतला जाणार आहे. या हिस्सा विक्रीत कंपनीचे अध्यक्ष सी.के.बिर्ला आणि इतर भागधारकांचा समावेश आहे. याचबरोबर कंपनीचे आणखी २६ टक्के हिस्सा ‘ओपन ऑफर’द्वारे खुल्या बाजारातून कंपनी खरेदी करणार आहे. ओरिएंटचे दक्षिण भारत आणि पश्चिम भारतात दोन उत्पादन प्रकल्प आहेत. अंबुजा सिमेंटकडून या वर्षात संपादित होत असलेली ही दुसरी कंपनी आहे.

हेही वाचा >>> सोन्यात गुंतवणुकीसाठी ‘मिरॅ ॲसेट गोल्‍ड ईटीएफ फंड ऑफ फंड’

ओरिएंटवरील ताब्यानंतर अंबुजा सिमेंटच्या उत्पादन क्षमतेत ८५ लाख टनांची भर पडून ते ९.७४ कोटी टनांवर जाईल. अदानी समूहाची २०२८ पर्यंत वार्षिक सिमेंट उत्पादन क्षमता १४ कोटी टनांवर नेण्याची योजना आहे. अदानी समूहाची सिमेंट उत्पादन क्षेत्रात मुख्य प्रतिस्पर्धी अल्ट्राटेक सिमेंट कंपनी असून, तिची वार्षिक उत्पादन क्षमता १४.९५ कोटी टन आहे. मुंबई शेअर बाजारात अंबुजा सिमेंटचा समभाग २.३४ टक्क्यांच्या घसरणीसह ५५८.५० रुपयांवर बंद झाला. सध्याच्या शेअरच्या बाजारभावानुसार, कंपनीचे १,३७,५६५ कोटी रुपयांचे बाजार भांडवल आहे.