नवी दिल्ली: अदानी समूहाने ‘एनडीटीव्ही’मधील बहुतांश भागभांडवली हिस्सेदारी खरेदी करत संपूर्ण मालकी हक्क मिळविला आहे. एनडीटीव्हीचे संस्थापक प्रणॉय रॉय आणि त्यांची पत्नी राधिका रॉय व अन्य प्रवर्तकांकडील समभाग १७ टक्के अधिक अधिमूल्य देऊन अदानी समूहातर्फे खरेदी करण्यात आले. ‘एनडीटीव्ही’ने शुक्रवारी बाजार मंचांना दिलेल्या माहितीनुसार, अदानी समूहाची ‘एनडीटीव्ही’मधील हिस्सेदारी आता ६४.७१ टक्क्यांवर पोहोचली आहे.
अदानी समूहातील तीन कंपन्यांनी चालू वर्षांत ऑगस्ट महिन्यात ‘न्यू दिल्ली टेलिव्हिजन लिमिटेड’ अर्थात एनडीटीव्ही या वृत्त प्रसारण वाहिनीमधील २९.१८ टक्के भागभांडवलाच्या अप्रत्यक्षरीत्या अधिग्रहण केले. त्यांनतर अदानी समूहाने गेल्या महिन्यात आणखी हिस्सेदारी विकत घेण्यासाठी विद्यमान भागधारकांपुढे खुला प्रस्ताव (ओपन ऑफर) ठेवला होता. अदानी समूहाने रॉय दाम्पत्याकडील उर्वरित ३२.२६ टक्के हिस्सेदारीपैकी २७.२६ टक्के हिस्सेदारी ३४२.६५ रुपये प्रतिसमभाग दराने खरेदी केली आहे. याबदल्यात रॉय यांना ६०२ कोटी रुपये देण्यात आले आहेत. अदानी समूहाने हिस्सेदारी थेट विकत घेण्यासाठी तिच्या विद्यमान भागधारकांपुढे ठेवलेल्या २९२ रुपये या प्रस्तावित किमतीपेक्षा १७ टक्के अधिक अधिमूल्य देण्यात आले.