मुंबई : परदेशी गुंतवणूकदारांकडून सुरू असलेली समभाग खरेदी आणि पड खाल्लेल्या अदानी समूहातील कंपन्यांचे समभाग वधारल्याचा एकत्रित परिणाम म्हणून प्रमुख निर्देशांकांनीही बुधवारी उभारी दर्शविली. सेन्सेक्सने अस्थिर वातावरणातही २३० अंशांची कमाई केली.
अदानी समूहाचे संस्थापक अध्यक्ष गौतम अदानी आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर व्यक्तिश: लाचखोरीचे आरोप नसल्याचा दावा करणारे स्पष्टीकरण अदानी समूहाकडून बुधवारी बाजारमंचांकडे करण्यात आले, तसेच त्यांच्यावर ‘वायर घोटाळ्या’चा अर्थात इलेक्ट्रॉनिक संप्रेषण अथवा दूरसंचार साधनांचा वापर करून आर्थिक देव-घेवीचे गैरव्यवहार केल्याचा आरोप असल्याचे समूहाकडून सांगण्यात आले. अशा प्रकारच्या गुन्ह्यांसाठी अमेरिकेत आर्थिक दंडाची तरतूद असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. या स्पष्टीकरणानंतर अदानी समूहातील काही कंपन्यांच्या समभागांनी २० टक्क्यांपर्यंत उसळी घेतली.
हेही वाचा >>>‘स्पेक्ट्रम’ लिलावांसाठी बँक हमीची अट शिथिल
दिवसअखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स २३०.०२ अंशांनी वधारून ८०,२३४.०८ पातळीवर स्थिरावला. दिवसभरात त्याने ५०७.०९ अंशांची कमाई करत त्याने ८०,५११.१५ या सत्रातील उच्चांकी पातळीला स्पर्श केला. दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये ८०.४० अंशांची वाढ झाली आणि तो २४,२७४.९० पातळीवर बंद झाला. निफ्टीने सत्रात २४,३५४.५५ या सत्रातील उच्चांकी आणि २४,१४५.६५ या नीचांकी पातळीला स्पर्श केला.
अमेरिकेच्या संभाव्य शुल्क आकारणीमुळे आशियाई भांडवली बाजारांमध्ये संमिश्र वातावरण होते. दरम्यान, अतिरिक्त प्रोत्साहन उपायांच्या अपेक्षेने चिनी भांडवली बाजारात मात्र तेजीचे वातावरण होते, असे निरीक्षण जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेसचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी नोंदवले.
हेही वाचा >>>अनिल अंबानींच्या रिलायन्स पॉवरला दिलासा
सेन्सेक्समध्ये अदानी पोर्ट्सचा समभाग ६ टक्क्यांनी उसळला. त्यापाठोपाठ एचडीएफसी बँक, एनटीपीसी, बजाज फायनान्स, मारुती आणि ॲक्सिस बँकेचे समभाग तेजीसह स्थिरावले. दुसरीकडे टायटन, स्टेट बँक, एशियन पेंट्स, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, एचसीएल टेक, सन फार्मा, इंडसइंड बँक आणि आयसीआयसीआय बँकेच्या समभागात घसरण झाली. परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांचा कल बदलला असून, ते सध्या निव्वळ खरेदीदार बनले आहेत. त्यांनी बुधवारी जोमदार खरेदी केली, तर मंगळवारच्या सत्रातदेखील १,१५७.७० कोटी रुपये मूल्याच्या समभागांची खरेदी केली.
सेन्सेक्स ८०,२३४.०८ २३०.०२ ( ०.२९%)
निफ्टी २४,२७४.९० ८०.४० ( ०.३३%)
डॉलर ८४.४४ १५ पैसे
तेल ७३.२३ ०.६३
रुपयात १५ पैशांची घसरण
अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपयांत १५ पैशांची घसरण होत तो ८४.४४ पातळीवर स्थिरावला. अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या व्यापार धोरणांबाबत अनिश्चितता निर्माण झाल्याने आणि खनिज तेलाच्या किमती पुन्हा वाढण्याच्या शक्यतेने बुधवारी रुपयाने डॉलरपुढे नांगी टाकली. मात्र देशांतर्गत आघाडीवर भांडवली बाजारातील मजबूत कल आणि परदेशी गुंतवणूकदार पुन्हा परतल्याने रुपयातील घसरण मर्यादित राहू शकली. तरी त्यामुळे वाढलेली सर्व चमक रुपयाने गमावली आणि रिझर्व्ह बँकेकडून डॉलरची विक्री होऊन सावरण्यापूर्वी तो ८४.४८ च्या नीचांकापर्यंत तो घसरला होता. महिनाअखेर असल्याने डॉलरची मागणी वाढल्याने रुपया कमकुवत झाला असून, गुरुवारच्या सत्रात तो ८४.३० ते ८४.५५ च्या श्रेणीत राहणे अपेक्षित आहे, असे असे फिनरेक्स ट्रेझरी ॲडव्हायझर्स कार्यकारी संचालक अनिल कुमार भन्साळी म्हणाले.