ACC Deal: अदाणी समूहाने सिमेंट क्षेत्रात आधीच त्यांच्या ACC आणि अंबुजा सिमेंट कंपन्यांच्या माध्यमातून मोठा बाजार हिस्सा मिळवला आहे. आता अदाणी समूह आणखी एक सिमेंट कंपनी विकत घेणार आहे. एसीसी लिमिटेडच्या बोर्डाने एशियन काँक्रीट आणि सिमेंट्स प्रायव्हेट लिमिटेडमधील उर्वरित ५५ टक्के हिस्सा खरेदी करण्याच्या निर्णयाला मान्यता दिली आहे. ACC ची ACCPL मध्ये आधीच ४५ टक्के हिस्सेदारी आहे.
ACC बोर्डाच्या बैठकीत घेतला निर्णय
ACC ची आज ८ जानेवारी रोजी बोर्डाची बैठक झाली आणि ४२५.९६ कोटी रुपयांमध्ये उर्वरित ५५ टक्के शेअरसाठी एशियन काँक्रीट आणि सिमेंट्सबरोबर करार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ACCPL ची नालागढ (हिमाचल प्रदेश) मध्ये १.३ MTPA सिमेंट क्षमता आहे. तिची उपकंपनी Asian Fine Cements Private Limited (AFCPL) ची राजपुरा (पंजाब) मध्ये १.५ MTPA सिमेंट क्षमता आहे. या करारात ही उपकंपनीही अदाणी समूहाच्या अंतर्गत येणार आहे.
अदाणी सिमेंट अंतर्गत ACC ने सेबीला माहिती दिली
आज एक्सचेंज फायलिंगमध्ये ACC ने अदाणी सिमेंटच्या वतीने सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) ला याबद्दल अधिकृत माहिती दिली आहे. ACC लिमिटेड ही अंबुजा सिमेंट्स लिमिटेडची उपकंपनी आहे. हे सिमेंट आणि बांधकाम साहित्य क्षेत्रातील आघाडीचे युनिट आहे. सध्याच्या एशियन काँक्रीट्स अँड सिमेंट्स प्रायव्हेट लिमिटेड (ACCPL) मध्ये ACC कडे आधीच ४५ टक्के हिस्सा आहे.
तसेच कंपनीने नियामक फायलिंगद्वारे ACCPL मधील उर्वरित ५५ टक्के भागभांडवल तिच्या विद्यमान प्रवर्तकाकडून ७७५ कोटी रुपयांच्या एंटरप्राइझ मूल्याने विकत घेण्याची घोषणा केली आहे. परिणामी, ACC ने ACCPL ची संपूर्ण मालकी संपादन केली आहे. यात रोख रक्कम आणि ३५ कोटी रुपयांच्या रोख रकमेचा समावेश आहे.
ACC शेअर्सची स्थिती काय?
सकाळी ११.३५ वाजता एसीसीचे शेअर्स २३५०.०५ रुपयांवर व्यवहार करत होते. त्यात २७.४० रुपयांची म्हणजेच १.१५ टक्क्यांची घसरण दिसून येत आहे.