मुंबईः अब्जाधीश गौतम अदानी यांच्या अदानी समूहाने सोमवारी रोख गंगाजळी आणि नफा यांचा लेखाजोखा सादर करून, आर्थिक बळ उत्तम असल्याचे दाखविण्याचा प्रयत्न केला. अमेरिकेत लाचखोरीप्रकरणी अदानी समूहावर खटला दाखल झाला असून, गुंतणूकदारांना आश्वस्त करण्यासाठी समूहाने हे पाऊल उचलले.
बंदरांपासून ऊर्जा क्षेत्रापर्यंत विविधांगी विस्तार साधलेल्या अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांच्यासह आणखी दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांवर लाचखोरीप्रकरणी अमेरिकेतील न्यायालयात दोषारोपपत्र दाखल झाले आहे. सौरऊर्जा कंत्राट मिळविण्यासाठी भारतीय अधिकाऱ्यांना लाच दिल्याचा आरोप त्यांच्यावर होत आहे. डॉलरमधील रोखे विक्री रद्द करण्याची नामुष्की यातून समूहावर आली आणि विदेशातून यापुढे कर्जउभारणी आव्हानात्मक ठरेल असे संकट समूहापुढे आहे. या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदारांपुढील आर्थिक स्थितीचे सादरीकरणात, समूहाकडे ५५,०२४ कोटी रुपयांची रोख गंगाजळी असल्याचे स्पष्ट केले. पुढील २८ महिन्यांतील दीर्घकालीन कर्जफेडीच्या हप्त्यांपेक्षा ही रक्कम जास्त असून, बाह्य कर्जाची अतिरिक्त गरज नसल्याचा त्यायोगे दावा करण्यात आला.
हेही वाचा >>>‘विप्रो’कडून बक्षीस समभाग पात्रतेसाठी ३ डिसेंबर रेकॉर्ड तारीख निश्चित
अदानी समूहाच्या एकूण संपत्तीत समभागांचे मूल्य दोनतृतीयांश आहे. गेल्या सहा महिन्यांत समूहाने ७५ हजार २२७ कोटी रुपयांची गुंतवणूक केली असून, एकूण कर्जात केवळ १६ हजार ८८२ कोटी रुपयांनी वाढ झाली आहे. समूहातील कंपन्यांकडे एकंदर ५५,०२४ कोटी रुपयांची रोख गंगाजळी आहे, त्या तुलनेत एकूण दायित्वाचे प्रमाण हे २१ टक्के आहे. पुढील १० वर्षांसाठी आखलेल्या विस्तार नियोजनांत समूहातील विविध कंपन्यांमध्ये ८ लाख कोटी रुपयांची गुंतवणुकीची अदानी समूहाची महत्त्वाकांक्षा योजना आहे.
समूहाकडून गुंतवणूकदारांना हा आर्थिक अहवाल पाठविण्यात आला आहे. काही जागतिक बँका आणि वित्तीय संस्थांनी अदानी समूहाला कर्जपुरवठा तात्पुरता थांबविल्याची चर्चा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर समूहाने हे पाऊल उचलल्याचे मानले जात आहे.
हेही वाचा >>>Stock Market Update :‘सेन्सेक्स’ची १९६१ अंशांची जोरदार मुसंडी
करपूर्व नफ्यात १७ टक्के वाढ
अदानी समूहाच्या करपूर्व नफ्यात गेल्या १२ महिन्यांत १७ टक्के वाढ होऊन तो ८३ हजार ४४० कोटी रुपयांवर पोहोचला आहे. पायाभूत सुविधा प्रकल्पांमुळे समूहाच्या नफ्यात सातत्यपूर्ण वाढ होत आहे. अदानी समूहाकडील वार्षिक रोख गंगाजळी पाहिल्यास त्यातून पुढील तीन वर्षांतील सर्व कर्जाची फेड करता येईल, असे समूहाने म्हटले आहे.
दोन दिवसांत अदानी समभागांना २.३६ लाख कोटींचा फटका
सोमवारच्या सत्रात अदानी समूहाच्या ११ पैकी सहा समभागांचे मूल्य वाढले. अमेरिकेने समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी आणि इतर सात जणांना लाचखोरीच्या आरोपाखाली दोषी ठरवल्यानंतर गुंतवणूकदारांनी समूहातील समभागांची विक्री केली. त्यामुळे शुक्रवारी समूहातील सर्व ११ समभाग जबर नुकसानीत होते. लाचखोरीच्या आरोपांचे मळभ जोवर सरत नाही तोवर अदानी समूहातील नियोजित गुंतवणुकीत नव्याने कोणतेही आर्थिक योगदान देणार नाही, असे फ्रान्सच्या टोटल एनर्जीजने सोमवारी स्पष्ट केल्यानंतर, अदानी ग्रीनचा समभाग सर्वाधिक ११ टक्क्यांनी घसरला. सप्ताहरंभीच्या सत्रात अदानींचे काही समभाग सावरले असले तरी मागील दोन सत्रांमध्ये समूहातील कंपन्यांना बाजार भांडवलात सुमारे २.३६ लाख कोटी रुपयांचे (२८ अब्ज डॉलरचे) एकत्रित नुकसान सोसावे लागले आहे.