मुंबई : गैरव्यवहार आणि लबाड्यांचा आरोप करणाऱ्या हिंडेनबर्ग रिसर्चच्या अहवालानंतर चाल लक्षणीय प्रमाणात मंदावलेल्या अदानी समूहाला मंगळवारचे भांडवली बाजारातील सत्र मात्र उपकारक ठरले. या एका सत्रात अदानी समूहातील दहा सूचिबद्ध कंपन्यांच्या समभागांमध्ये गुंतवणूकदारांनी चौफेर खरेदी केल्याने, समूहाच्या एकत्रित बाजार भांडवलात ५०,५०१ कोटी रुपयांची भर पडली.
मंगळवारी व्यवहाराअंती मुंबई शेअर बाजारात समूहाचे बाजार भांडवल १०.६ लाख कोटींहून अधिक झाले. बाजार मंचाकडून उपलब्ध आकडेवारीवरून मागील वर्षीच्या याच कालावधीतील १०.१ लाख कोटींच्या बाजार भांडवलाच्या तुलनेत ते १०,५०१.२६ कोटी रुपयांनी अधिक असल्याचे स्पष्ट होते.
अदानी ग्रीन एनर्जीचा समभाग १० टक्क्यांनी म्हणजेच ९८.९० रुपयांनी वाढून १,०८८.०५ रुपयांवर स्थिरावला. ऑगस्ट महिन्यात अदानी ग्रीन एनर्जीमध्ये गुंतवणुकीस उत्सुक संस्थांसोबत बैठक असल्याने मंगळवारच्या सत्रात तेजी दिसून आली. कंपनीचे व्यवस्थापन १६ ते २२ ऑगस्टदरम्यान अवेंडस स्पार्क, एमके ग्लोबल आणि मोतीलाल ओसवाल यांना स्वतंत्रपणे भेटणार आहे. तर जागतिक दलाली पेढी नोमुराने ३० ऑगस्ट रोजी विश्लेषक आणि गुंतवणूकदारांच्या बैठकीत सहभागास स्वारस्य दाखवले आहे.
अदानी पॉवरचा समभागदेखील ९.२ टक्क्यांनी वाढून २५९.९५ रुपयांवर बंद झाला. अदानी ट्रान्समिशनच्या समभागातही खरेदीचा उत्साह दिसून आल्याने तो ८ टक्के वाढीसह ८३४.८५ रुपयांवर बंद झाला. अमेरिकी कंपनी जीक्यूजी या कंपनीने अदानी ट्रान्समिशनमध्ये आणखी ३ टक्के हिस्सेदारी मिळवत, तिची एकूण हिस्सेदारी आता ६.५४ टक्क्यांवर पोहोचली आहे, अशी माहिती अदानी समूहाने बाजार मंचांना दिली. तसेच म्युच्युअल फंडांनीदेखील अदानी समूहाच्या १० पैकी ७ कंपन्यांमध्ये त्यांची हिस्सेदारी वाढवली आहे.