पीटीआय, नवी दिल्ली
अब्जाधीश गौतम अदानी यांच्या कुटुंबाने अंबुजा सिमेंटमध्ये ८,३३९ कोटी रुपयांची अतिरिक्त गुंतवणूक केली, ज्यामुळे त्यांचा कंपनीतील हिस्सा ७०.३ टक्क्यांपर्यंत वाढला आहे. याआधी अदानी समूहाने १८ ऑक्टोबर २०२२ रोजी कंपनीमध्ये ५,००० कोटी रुपये आणि २८ मार्च २०२४ रोजी ६,६६१ कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती. आता या नव्याने केलेल्या गुंतवणुकीसह, त्यांची २०,००० कोटी रुपयांची नियोजित गुंतवणूक पूर्ण केली आहे, असे कंपनीने एका निवेदनात म्हटले आहे.
हेही वाचा… वित्तीय, तंत्रज्ञान क्षेत्राची आघाडी; लिंक्डइनकडून देशातील मोठ्या २५ कंपन्यांची यादी जाहीर
ताज्या गुंतवणुकीने, आता अंबुजा सिमेंटमधील अदानी कुटुंबाचा हिस्सा ३.६ टक्क्यांनी वाढवून ७०.३ टक्क्यांवर पोहोचला आहे. सप्टेंबर २०२२ मध्ये अदानी समूहाने एकूण ६.५ अब्ज डॉलरच्या (सुमारे ५२ हजार कोटी रुपये) मोबदल्यात अंबुजा सिमेंट्स आणि एसीसी या कंपन्यांच्या संपादनाची प्रक्रिया पूर्ण केली होती. स्विस कंपनी होल्सिमची या दोन कंपन्यांमधील हिश्शाची खरेदी आणि त्यानंतर अल्पसंख्याक भागधारकांकडून खुल्या प्रस्तावाद्वारे समभागांची खरेदीचा मार्ग अवलंबला होता. ३१ डिसेंबर २३२३ अखेरपर्यंत ७.६१ कोटी टनांवरून वर्ष २०२८ पर्यंत त्याची विद्यमान क्षमता १४ कोटी टन म्हणजेच प्रतिवर्षी जवळपास दुप्पट करण्यासाठी अंबुजाला या गुंतवणुकीमुळे मदत होईल.