पीटीआय, नवी दिल्ली

गौतम अदानी यांच्या मालकीच्या समूहाने गृहनिर्माण क्षेत्रातील आघाडीची कंपनी एम्मार इंडियाला सुमारे १.४ ते १.५ अब्ज अमेरिकी डॉलर (सुमारे १३ हजार कोटी) मोबदल्यात खरेदी करण्याच्या योजनेला अंतिम रूप दिले असून, या व्यवहारासंबंधाने चर्चा सुरू केल्याचे गुरुवारी सूत्रांनी स्पष्ट केेले.

दुबईस्थित एम्मार प्रॉपर्टीजने २००५ मध्ये भारताच्या एमजीएफ डेव्हलपमेंटसोबत भागीदारीत भारतीय गृहनिर्माण क्षेत्रात प्रवेश केला आणि एम्मार एमजीएफ लँड या संयुक्त उपक्रम कंपनीद्वारे विविध मालमत्तांमध्ये ८,५०० कोटी रुपयांची गुंतवणूक देखील केली. एप्रिल २०१६ मध्ये, एम्मार प्रॉपर्टीजने विलगीकरण प्रक्रियेद्वारे संयुक्त उपक्रम संपवण्याचा निर्णय घेऊन स्वतंत्रपणे कार्य सुरू ठेवले आहे. एम्मार इंडियाकडे सध्या दिल्ली-एनसीआर, मुंबई, मोहाली, लखनऊ, इंदूर आणि जयपूरमध्ये निवासी आणि व्यावसायिक मालमत्ता आहेत.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दुबईस्थित एम्मार प्रॉपर्टीज आणि अदानी समूहात सध्या चर्चा सुरू आहे. मात्र यायोजनेबाबत अधिकृतपणे भाष्य करण्यास उभयतांनी नकार दिला.भारतातील व्यवसायातील काही हिस्सा विक्रीसाठी कंपन्यांशी चर्चा सुरू असल्याचे एम्मार प्रॉपर्टीजने जानेवारी महिन्यात सांगितले होते. भारतातील उपकंपनी विक्री करण्याचा विचार करत असली तरी अद्याप मूल्यांकन आणि हिस्सा विक्रीचे प्रमाण किती असेल याबाबत निश्चित केलेले नसल्याचे तिने स्पष्ट केले होते. अदानी समूह तिच्या असूचिबद्ध कंपन्यांच्या माध्यमातून भारतीय गृहनिर्माण क्षेत्रात सक्रिय आहे. अदानी रिॲल्टी सध्या भारतातील प्रमुख शहरांमध्ये अनेक प्रकल्प विकसित करत आहे. समूहाने पुनर्विकास प्रकल्प देखील मिळविले आहेत, ज्यात मुंबईतील आशियातील सर्वात मोठ्या झोपडपट्ट्यांपैकी एक असलेल्या धारावीचा समावेश आहे.

एम्मार प्रॉपर्टीज ही दुबईच्या भांडवली बाजारात सूचिबद्ध कंपनी असून तिची दक्षिण आशिया, उत्तर आफ्रिका आणि आखातात उपस्थिती आहे. जगातील सर्वात मोठ्या गृहनिर्माण कंपन्यांपैकी एक असलेल्या एम्मारकडे संयुक्त अरब अमिराती आणि प्रमुख आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये सुमारे १.७ अब्ज चौरस फूट जमीन आहे. बुर्ज खलिफा आणि दुबई मॉल हे एम्मार प्रॉपर्टीजने विकसित केलेल्या प्रमुख प्रकल्पांपैकी एक आहेत.

Story img Loader