मुंबई : आर्थिक गैरव्यवहाराच्या चौकशीत, स्विस अधिकाऱ्यांकडून अदानी समूहाशी संलगभन २,६१० कोटी रुपयांची खाती गोठवल्याच्या गुरुवारी केल्या गेलेल्या आरोपाचे शुक्रवारी भांडवली बाजारात पडसाद उमटले. अदानी समूहाने हे आरोप फेटाळणारा खुलासा केल्यानंतरही, समूहातील अनेक कंपन्यांच्या समभागांना घसरणीची झळ बसली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> बुच दाम्पत्याचे काँग्रेसच्या आरोपांना प्रत्युत्तर; ‘प्राप्तिकर विवरणपत्राच्या आधारे चुकीचे आरोप’

मुंबई शेअर बाजारात, अदानी पॉवरचा समभाग सर्वाधिक २.७३ टक्क्यांनी घसरला. बरोबरीने, अदानी एनर्जी सोल्युशन्स २.४२ टक्के, अदानी पोर्ट्स १.३७ टक्के, अदानी ग्रीन एनर्जी १.१७ टक्के, अदानी एंटरप्रायझेस ०.७६ टक्के, अदानी टोटल गॅस ०.५५ टक्के, तर अदानी विल्मरचा समभाग ०.३७ टक्क्यांनी घसरला. अदानी समूहातील १० कंपन्यांपैकी केवळ तीन कंपन्यांचे म्हणजेच एसीसी (१.९४ टक्के), एनडीटीव्ही (१.०१ टक्के) आणि अंबुजा सिमेंट्स (०.०१ टक्के) समभाग शुक्रवारी वाढीसह बंद झाले.

अदानी समूहाशी संबंधित स्विस बँकेतील खाती गोठवली गेल्याचे स्विस माध्यमांच्या वृत्ताचा हवाला देत, हिंडेनबर्ग रिसर्चने गुरुवारी रात्री ‘एक्स’ या समाजमाध्यमावरील टिप्पणी केली. त्यावर लगेचच प्रतिक्रिया देताना, अदानी समूहाने हे आरोप बिनबुडाचे असल्याचे म्हणत ते नि:संदिग्धपणे नाकारत असल्याचा खुलासा केला. अदानी समूहाचा स्विस न्यायालयाच्या कोणत्याही खटल्यात सहभाग नाही किंवा कंपनीची कोणतीही खाती कोणत्याही प्राधिकरणाने गोठवली अथवा जप्त केलेली नाहीत, असे प्रवक्त्याने म्हटले आहे.

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Adani group shares drop after hindenburg claim adani swiss bank accounts freeze print eco news zws