मुंबई : अदानी समूहातील कंपन्यांच्या समभागांमध्ये सोमवारी भांडवली बाजारात मोठी तेजी दिसून आली. समूहातील कंपन्यांत गैरप्रकार झाल्याचा आरोप करणारा हिंडेनबर्ग रिसर्चचा अहवाल आल्यानंतर, गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात कंपन्यांचे समभाग कोसळले होते. कंपन्यांच्या समभाग मूल्याने सोमवारी पुन्हा या अहवालाच्या आधीची पातळी गाठली.
हेही वाचा >>> सेन्सेक्ससाठी आजचा विक्रमी दिवस, रेकॉर्डब्रेक उसळीसह बंद होतानाही मोठी झेप; गुंतवणूकदार मालामाल!
अदानी समूहातील कंपन्यांच्या समभागांनी आज ५२ आठवड्यांतील उच्चांकी पातळी गाठली. लोकसभा निवडणुकीच्या बहुतांश मतदानोत्तर चाचण्यांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार मोठ्या बहुमतासह पुन्हा सत्तेत येईल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. यामुळे भांडवली बाजारात तेजीचे वारे आहे. अदानी समूहातील अदानी पॉवर कंपनीच्या समभागात आज १५.६४ टक्के वाढ नोंदविण्यात आली.
तसेच, समूहातील अदानी ग्रीन एनर्जीच्या सभागात ६.३९ टक्के, अदानी पोर्ट्स १०.२५ टक्के, अदानी एनर्जी सोल्यूशन्स ६.८६ टक्के आणि अदानी एंटरप्रायजेस ६.८ टक्के वाढ नोंदविण्यात आली. अदानी टोटल गॅसच्या समभागात ७.७७ टक्के आणि अदानी विलमारच्या समभागात ३.५ टक्के वाढ झाली. याचबरोबर समूहातील एसीसी, अंबुजा सिमेंट्स आणि एनडीटीव्ही या कंपन्यांच्या समभागात ५.५ ते ७ टक्के वाढ नोंदविण्यात आली.
हेही वाचा >>> Gold-Silver Price: निवडणूक निकालाच्या आधी सोन्याच्या किमतीत मोठा फेरबदल, १० ग्रॅमची किंमत ऐकून ग्राहकांच्या चेहऱ्यावर आनंद
बाजार भांडवलात १.६ लाख कोटींनी वाढ
अदानी समूहातील १० सूचिबद्ध कंपन्यांच्या बाजारभांडवलात एकत्रितरित्या १.६ लाख कोटी रुपयांची वाढ झाली. यामुळे समूहातील कंपन्यांचे एकत्रित बाजारभांडवल बाजार बंद होताना १९.४२ लाख कोटी रुपयांवर पोहोचले. हिंडेनबर्ग रिसर्चचा अहवाल गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात आला त्यावेळी अदानी समूहातील कंपन्यांचे बाजारभांडवल १९.२० लाख कोटी रुपये होते. आता पुन्हा बाजारभांडवल त्या पातळीपुढे मुसंडी मारली असून, या समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांनीही आशियातील सर्वात श्रीमंत उद्योगपती म्हणून गतवर्षी जानेवारीअखेर गमावलेले स्थान पुन्हा काबीज केले आहे.