नवी दिल्लीः अब्जाधीश उद्योगपती गौतम अदानी यांच्या मालकीच्या समूहावर अमेरिकेत दाखल झालेल्या लाचखोरीच्या खटल्यानंतर, या समूहाकडून त्यानंतर पहिल्या मोठ्या आर्थिक व्यवहाराचे पाऊल पडले आहे. ग्राहकोपयोगी उत्पादनांच्या क्षेत्रातील अदानी विल्मर कंपनीतून पूर्णपणे बाहेर पडण्याचा आणि या माध्यमातून २०० कोटी डॉलरचा (सुमारे १७,१०० कोटी रुपये) निधी उभारण्याचा निर्णय अदानी समूहाने घेतल्याचे सोमवारी जाहीर केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

फार्च्युन या नाममुद्रेने खाद्यतेल, गव्हाचे तयार पीठ आणि इतर खाद्यवस्तूंचे उत्पादन घेणारी अदानी विल्मर लिमिटेड ही सिंगापूरस्थित विल्मर इंटरनॅशनलसह अदानी समूहाची संयुक्त भागीदारीतील कंपनी आहे. या कंपनीत उभयतांचा प्रत्येकी ४३.९४ टक्के असा समान भागभांडवली हिस्सा आहे. यातील ३१.०६ टक्के हिस्सा सिंगापूरमधील भागीदार कंपनीला अदानींकडून विकण्यात येणार आहे. जेणेकरून प्रवर्तक या नात्याने विल्मर इंटरनॅशनलची कंपनीतील मालकी ही ७५ टक्के या नियमानुसार कमाल परवानगी असलेल्या मात्रेपर्यंत वाढेल. विल्मर इंटरनॅशनला प्रति समभाग ३०५ रुपये मूल्याने हा हिस्सा विकून १२,३१४ कोटी रुपये अदानी समूह उभारेल. तर उरलेला १३ टक्के हिस्सा खुल्या बाजारात समभाग विक्री (ऑफर फॉर सेल -ओएफएस) माध्यमातून विकला जाणार आहे, ज्यायोगे आणखी साधारण ४,८०० कोटी रुपये समूहाला मिळविता येतील. अशा तऱ्हेने या हिस्सा विक्रीतून एकत्रितपणे अदानी समूहाला सुमारे १७,१०० कोटी रुपयांचा (साधारण २०० कोटी डॉलर) निधी मिळणे अपेक्षित आहे.

हेही वाचा : Gold Silver Price Today : वर्षाच्या शेवटी सोन्या- चांदीच्या दरात वाढ की घसरण? जाणून घ्या मुंबई, पुण्यासह या शहारांतील आजचा २४ कॅरेट सोन्याचा दर

अदानी विल्मरमधून अदानी समूह पूर्णपणे बाहेर पडल्यानंतर, समूहाने नियुक्त केलेले संचालकही या कंपनीतून पायउतार होतील. हा सर्व व्यवहार ३१ मार्च २०२५ पर्यंत पूर्णत्वास जाणे अपेक्षित आहे. या व्यवहारातून मिळालेल्या निधीचा वापर अदानी समूह पायाभूत सुविधा व्यवसायासाठी करणार आहे. समूहाला रोकड तरलतेच्या अडचणींवरही यातून मात करता येईल. अदानी समूहावर नोव्हेंबर महिन्यात अमेरिकेतील लाचखोरीचा खटल्यात आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. त्यानंतर समूहाने उचललेले हे मोठे पाऊल आहे. अदानी समूहाने लाचखोरीचे सर्व आरोप फेटाळून लावले होते आणि कायदेशीर मार्गाने लढा देण्याचे जाहीर केले आहे.

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Adani group to exit adani wilmar sell stake to raise over 2 billion dollars print eco news css