Adani Power Shares : शेअर बाजारात अदाणी पॉवरच्या शेअर्सनी गेल्या दोन दिवसांत दमदार कामगिरी करत २६.९६ टक्क्यांची वाढ नोंदवली आहे. बुधवारी हा शेअर सहा टक्क्यांनी वाढत दिवसाच्या ५७१.५० रुपयांच्या उच्चांकावर पोहोचला. यानंतर बीएसई आणि एनएसईने शेअर्सच्या किमतीतील चढउताराबद्दल कंपनीकडून स्पष्टीकरण मागितले आहे.
यावर अदानी पॉवरने उत्तर दिले असून, ते म्हणाले की, “कोणत्याही कंपनीच्या शेअर्सच्या व्हॉल्यूममध्ये होणारी चढउतार ही पूर्णपणे बाजार परिस्थिती आणि बाजारावर अवलंबून असते. कंपनीच्या व्यवस्थापनाचे यावर कोणतेही नियंत्रण नाही. त्याचबरोबर कंपनीच्या इक्विटी शेअर्सच्या व्हॉल्यूममध्ये कशामुळे वाढ झाली याचे कारण आम्हाला माहिती नाही.”
बुधवारी २७.४६ लाख शेअर्सची खरेदी विक्री
आज बीएसईवर अदाणी पॉवरच्या शेअरचा ट्रेडिंग व्हॉल्यूम उच्चांकावर होता. त्यामुळे २७.४६ लाख शेअर्सची खरेदी विक्री झाली. ही आकडेवारी ८.७३ लाख शेअर्सच्या गेल्या दोन आठवड्यांच्या तुलनेत मोठी होती. यातून तब्बल १५०.९१ कोटी रुपयांची उलाढाल झाल्याने बाजार भांडवल २,१२,६३३.०४ कोटी रुपयांवर पोहचले आहे. डिसेंबर २०२४ रोजी उपलब्ध झालेल्या बीएसईच्या आकडेवारीनुसार, प्रवर्तकांकडे कंपनीत ७४.९६ टक्के इतका हिस्सा आहे.
दरम्यान, अदाणी पॉवर शेअरचा सपोर्ट ५३० ते ५१४ रुपयांच्या दरम्यान तर रेझिस्टन्स ६०० रुपये असू शकतो.
अदाणी पॉवर शेअर उच्चांकापासून ६७ टक्के दूर
अदानी पॉवरच्या शेअरमध्ये गेल्या दोन दिवसांपासून मोठी तेजी दिसून येत आहे. असे असले तरीही, हा शेअर अजूनही त्याच्या ५२ आठवड्यांच्या उच्चांक ८९५.८५ रुपयांपासून ६७% दूर आहे. २१ नोव्हेंबर २०२४ रोजी हा शेअर ४३२ रुपयांच्या ५२ आठवड्यांच्या नीचांकी पातळीवर पोहोचला होता. नोव्हेंबरमध्ये समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांच्यासह इतर सहकाऱ्यांवर लाचखोरी आणि बनावटगिरी प्रकरणात आरोप झाल्यानंतर शेअरच्या किमतीत घसरण झाली होती.
अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदाणी, त्यांचा पुतण्या सागर अदाणींसह इतर सहा जणांवर न्यू यॉर्कमधील न्यायालयाने, भारतीय सरकारी अधिकाऱ्यांना २,०२९ कोटी रुपयांची लाच दिल्याचा आरोप लावला आहे.
उर्जा क्षेत्रातील शेअर्सची आजची कामगिरी
आज शेअर बाजारात आयनॉक्स विंड लिमिटेड, रवींद्र एनर्जी लिमिटेड, एनर्जी डेव्हलपमेंट कंपनी लिमिटेड, आयनॉक्स विंड एनर्जी लिमिटेड, एनटीपीसी लिमिटेड, टोरेंट पॉवर लिमिटेड, पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेड, जेएसडब्ल्यू एनर्जी लिमिटेड आणि केपीआय ग्रीन एनर्जी लिमिटेड हे उर्जा क्षेत्रातील वाढ झालेले अव्वल दहा शेअर्स होते.