म्युच्युअल फंडात गुंतवणुकीचा सर्वोत्तम मानला गेलेला आणि लोकप्रिय ठरलेला मार्ग म्हणजेच ‘सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन – एसआयपी’ खाती बंद केले जाण्याचे प्रमाण महिनागणिक वाढत असून, सरलेल्या मे महिन्यात ते ७.४ टक्क्यांनी वाढून १४.१९ लाखांवर गेले आहे. त्याच वेळी, नवीन ‘एसआयपी’ खात्यांच्या नोंदणींची संख्या या महिन्यात २४.७ लाख इतकी असून, ही संख्या एप्रिलमधील १९.५६ लाखांच्या तुलनेत, पाच लाखांहून अधिक वाढ दर्शवणारी आहे.

असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडिया (ॲम्फी) मार्फत संकलित या आकडेवारीनुसार, बंद झालेल्या किंवा मुदतपू्र्ती झालेल्या एसआयपी खात्यांची संख्या एप्रिलमधील १३.२१ लाखांवरून मेमध्ये १४.१९ लाख झाली. एकंदरीत, २०२२-२३ या संपूर्ण आर्थिक वर्षात १.४३ कोटी एसआयपी खाती बंद केली गेली होती, ज्याचे प्रमाण २०२१-२२ मधील १.११ कोटींपेक्षा जास्त होते. तथापि, या कालावधीत नवीन एसआयपी खात्यांच्या नोंदणीची संख्याही वाढत आली आहे.

हेही वाचाः अनिल अंबानींवर आणखी एक संकट; आता ‘ही’ कंपनी बंद होण्याची शक्यता

या आकडेवारीबाबत बोलताना, एसबीआय म्युच्युअल फंडाचे मुख्य व्यवसाय अधिकारी डीपी सिंग म्हणाले की, एसआयपी खंडित केली जाण्यापेक्षा नवीन एसआयपी खात्यांच्या नोंदणीची जास्त संख्या ही या गुंतवणूक पद्धतीवरील विश्वासालाच अधोरेखित करणारी आहे. दरम्यान म्युच्युअल फंडातील ’एसआयपी’ गुंतवणुकीने सरलेल्या मे महिन्यात १४,७४९ कोटी रुपयांच्या विक्रमी मासिक ओघाचा टप्पा ओलांडला आहे. या मजबूत प्रवाहामुळे एसआयपी खात्यांतर्गत एकूण गंगाजळी (एयूएम) एप्रिलमधील ७.१७ लाख कोटी रुपयांवरून मे महिन्यात पाच टक्क्यांनी वाढून ७.५३ लाख कोटी रुपये झाली आहे.

हेही वाचाः ५ अन् १० नव्हे तर जुलैमध्ये ‘इतके’ दिवस बँका राहणार बंद; पाहा संपूर्ण यादी

एसआयपी गुंतवणूक खंडित केले जाण्याचे उच्च प्रमाणासह, एसआयपीद्वारे वाढत्या गुंतवणुकीचा प्रवाह पाहता नवीन गुंतवणूकदारांकडून एसआयपीच्या माध्यमातून सरासरी आकारापेक्षा जास्त पैसा गुंतवला जात असल्याचे दर्शविणारे आहे. दुसरीकडे समभागसंलग्न अर्थात इक्विटी म्युच्युअल फंडांच्या विक्रीत महिन्यागणिक २१ टक्क्यांची वाढ होऊन, मे महिन्यांत या फंडातील गुंतवणुकीत ३४,१०० कोटी रुपयांची भर पडली. त्याच वेळी, या फंडातील युनिट्सची विक्री जवळपास ३७ टक्क्यांनी वाढून ३१,१०० कोटी रुपयांवर पोहोचली. परिणामी, निव्वळ ओघ मे महिन्यात ३,२४० कोटी रुपयांच्या नीचांकी पातळीवर घसरला. ओघ घटण्याचा हा एप्रिलपाठोपाठ सलग दुसरा महिना होता.

Story img Loader