नवी दिल्ली, पीटीआय
हँडबॅग, मनगटी घड्याळे, पादत्राणे यासारख्या १० लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या वस्तूंवर एक टक्का उद्गम कर संकलन (टीसीएस) आता लागू होणार आहे. प्राप्तिकर विभागाने याबाबत बुधवारी अधिसूचना काढली.प्राप्तिकर विभागाने यंदा जानेवारीपासून १० लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या मोटारींवर एक टक्का टीसीएस आकारणी सुरू केली. आता अन्य महागड्या ऐषारामी वस्तूंवरही एक टक्का टीसीएस आकारला जाणार आहे. त्यात मनगटी घड्याळे, चित्रे, शिल्प, मौल्यवान वस्तू, याट, हेलिकॉप्टर, हँडबॅग, सनग्लासेस, क्रीडा वस्त्रप्रावरणे आणि साहित्य, होम थिएटर प्रणाली आणि शर्यती अथवा पोलोसाठी घोडे यांचा समावेश आहे. या वस्तूंच्या विक्रीसमयीच ग्राहकांकडून टीसीएस संकलित केला जाणार आहे. ग्राहकाला प्राप्तिकर विवरणपत्र भरताना हे करदायित्व म्हणून दाखवता येणार आहे.
टीसीएसमुळे अतिरिक्त महसूल सरकारला मिळणार नसला तरी प्राप्तिकर विभागाला जास्त रकमेचे व्यवहार शोधण्यास मदत होणार आहे. कारण ग्राहकाला महागड्या वस्तूंची खरेदी करताना त्याच्या प्राप्तिकर स्थायी खाते क्रमांक अर्थात ‘पॅन’चे तपशील द्यावे लागतील. टीसीएसचे संकलन करण्याची जबाबदारी विक्रेत्याची असणार आहे. केंद्र सरकारने वित्त कायदा २०२४ मधील तरतुदीनुसार महागड्या वस्तूंवर टीसीएस लागू केला आहे.
सरकारकडून मोठ्या रकमेच्या व्यवहारांवर लक्ष ठेवण्याचे पाऊल उचलण्यात आले आहे. त्यातून महागड्या ऐषारामी वस्तूंच्या व्यवहारांची माहिती सरकारला मिळेल. यामुळे करदात्यांची संख्या वाढण्यासोबत वित्तीय पारदर्शकतेतही वाढ होईल.- संदीप झुनझुनवाला, भागीदार, नांगिया अँडरसन एलएलपी