लोकसत्ता व्यापार प्रतिनिधी
मुंबई: आदित्य बिर्ला सन लाइफ म्युच्युअल फंडाने क्वांट-आधारित गुंतवणूक संकल्पनेला अनुसरून ‘आदित्य बिर्ला सन लाइफ क्वांट फंड’ गुंतवणुकीस खुला केला आहे. फंडात प्रारंभिक गुंतवणूक (एनएफओ) १० जूनपासून खुली झाली असून, ती २४ जूनपर्यंत सुरू असेल.
आदित्य बिर्ला सन लाइफ म्युच्युअल फंडाकडून दाखल झालेला हा पहिलाच क्वांट-आधारित गुंतवणूक पर्याय आहे. नव्याने दाखल फंडात ४० ते ५० समभागांचा समावेश असेल आणि जेणेकरून हा फंड लार्ज व मिड कॅप श्रेणीमध्ये सामावला जाईल अशा समभागांची निवड केली जाईल, असे या फंड घराण्याचे सह-गुंतवणूक अधिकारी आणि समभाग गुंतवणुकीचे प्रमुख हरिश कृष्णन म्हणाले.
हेही वाचा >>>सर्वात महागड्या शहरांच्या यादीत मुंबई आशियातून २१ व्या स्थानावर, पुण्यासह अन्य शहरं कितव्या स्थानी?
मानवी कौशल्य आणि क्वांटिटेटिव्ह मॉडेल्सच्या संयुक्त क्षमतांचा फायदा घेत वैविध्यपूर्ण गुंतवणूक पर्याय या नवीन क्वांट फंडातून गुंतवणूकदारांना उपलब्ध केला गेला असल्याचे आदित्य बिर्ला सन लाइफ एएमसी लि.चे व्यवस्थापकीय संचालक व मुख्याधिकारी ए. बालसुब्रमणियम म्हणाले. आजच्या गुंतागुंतीच्या बाजारपेठेत क्वांटिटेटिव्ह गुंतवणूक धोरणाद्वारे पारदर्शकता, भावना-मुक्त निर्णय घेणे आणि प्रबळ जोखीम व्यवस्थापन अशी बहुमूल्य फायदे मिळविता येतील, असे त्यांनी सूचित केले.