पुणे: बहुराज्यात विस्तार असलेल्या कॉसमॉस को-ऑपरेटिव्ह बँकेच्या अध्यक्षपदी ॲड. प्रल्हाद कोकरे यांची, तर उपाध्यक्षपदी सनदी लेखापाल यशवंत कासार यांची गेल्या महिन्यात २६ डिसेंबर रोजी निवड करण्यात आली. सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी संजय राऊत यांच्या उपस्थितीत झालेल्या नवीन संचालक मंडळाच्या बैठकीत एकमताने ही निवड झाली आहे. कॉसमॉस बँकेच्या संचालक मंडळाची २०२५ ते २०२९ या कार्यकाळासाठी नुकतीच बिनविरोध निवडणूक पार पडली.
हेही वाचा >>> नीचांकी पातळीवरून रुपया ८ पैशांनी सावरला
अध्यक्ष ॲड. कोकरे हे गेली २० वर्षे बँकेच्या संचालक मंडळावर कार्यरत असून ते एक यशस्वी प्रशासक आणि राज्य सरकारच्या सहकार विभागात सहनिबंधक सहकारी संस्था या पदावरून निवृत्त झाले आहेत. २०१९-२० आणि २०२०-२१ या दोन वर्षात ते बँकेचे उपाध्यक्ष होते. नोव्हेंबर २०२४ पासून ते बँकेचे अध्यक्ष म्हणून काम पाहत होते. गेल्या २० वर्षात संचालकांच्या विविध समित्यांवर ते कार्यरत आहेत. तर उपाध्यक्ष यशवंत कासार हे सनदी लेखापाल असून इन्स्टिटयूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंटस् ऑफ इंग्लंड अँड वेल्सचे ते सदस्य आहेत. तसेच सर्टिफाईड इन्फर्मेशन सिस्टीम ऑडिटर, सर्टिफाईड इन गव्हर्नन्स ऑफ एंटरप्राईज आयटी (सीजीईआयटी), प्रोजेक्ट मॅनेजमेंट प्रोफेशनल आणि असोसिएशन ऑफ इंटरनॅशनल अकाउंटंटस् लंडन येथील सदस्य आहेत. कासार हे इंन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडियाच्या पश्चिम विभागाचे २०१९-२५ या कालावधीसाठी प्रादेशिक परिषद सदस्य आहेत. कर, कायदे व वित्त क्षेत्रातील तज्ज्ञ आहेत. २०१९ पासून कॉसमॉस बँकेचे संचालक म्हणून ते कार्यरत आहेत.