लोकसत्ता व्यापार प्रतिनिधी
मुंबई : मुंबईस्थित एरोफ्लेक्स इंडस्ट्रीजच्या समभागाने गुरुवारी भांडवली बाजारात दमदार पाऊल टाकले. सार्वजनिक प्रारंभिक विक्रीद्वारे गुंतवणूकदारांना गत आठवड्यात प्रत्येकी १०८ रुपये किमतीला मिळालेल्या कंपनीच्या समभागांची गुरुवारी शेअर बाजारात सूचिबद्धता झाली आणि त्याचे प्रारंभिक व्यवहार त्यापेक्षा ८३ टक्के अधिक किमतीवर म्हणजेच १९७.४० रुपयांच्या पातळीवर सुरू झाले.
मुंबई शेअर बाजारात समभाग जरी ८२.८ टक्क्यांच्या अधिमूल्यासह सूचिबद्ध झाला तरी दिवसअखेर उच्चांकी पातळीवरून त्यात घसरण झाली. सत्रातील व्यवहारात तो १९७.४० रुपयांपर्यंत झेपावला. तर त्याने १६२.१० रुपये हा दिवसाचा तळही गाठला. दिवसअखेर समभाग ५१.१६ टक्क्य़ांनी म्हणजेच ५५.२५ रुपयांनी उंचावत १६३.२५ रुपयांवर स्थिरावला.
आणखी वाचा-विकासदर ७.८ टक्के, सर्वात वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थेचे बिरुद कायम
एरोफ्लेक्स इंडस्ट्रीजचा ‘आयपीओ’ २२ ऑगस्ट रोजी खुला झाला होता. कंपनीने या माध्यमातून ३५१ कोटी रुपयांचा निधी उभारला आहे. प्रत्येकी १०२ ते १०८ रुपये किंमतपट्टा निश्चित करण्यात आला होता. मुंबईस्थित एरोफ्लेक्स ही मेटॅलिक फ्लेक्झिबल फ्लो सोल्युशन उत्पादनांची उत्पादक आणि पुरवठादार आहे, जी आपली उत्पादने युरोप आणि अमेरिकेसह ८० हून अधिक देशांमध्ये निर्यात करते आणि निर्यातीतून ८० टक्के महसूल मिळवते.