छत्रपती संभाजीनगर : विद्युत दुचाकी निर्मितीतील ‘एथर एनर्जी’ने देशातील तिच्या तिसऱ्या उत्पादन प्रकल्पासाठी दिल्ली-मुंबई औद्योगिक पट्ट्यातील बिडकीन येथे १०० एकरांच्या भूखंडाची निवड केली असून, लवकरच या संबंधाने सामंजस्य करार केला जाणे अपेक्षित आहे.

यामुळे राज्यात छत्रपती संभाजीनगरच्या औद्योगिक वसाहतीमध्ये आणखी एका मोठ्या उद्योगाची गुंतवणूक वाढेल, असे सांगण्यात येत आहे. या प्रकल्पात साधारणत: एक हजार कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक होणार असून, तेवढाच रोजगार उपलब्ध होईल, असे सूत्रांनी सांगितले. भूखंड वाटपाच्या बैठकीत याबाबतचा अंतिम निर्णय येत्या आठ-दहा दिवसांत होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा >>>गृहनिर्माण, पायाभूत सुविधांवर १५ लाख कोटींची गुंतवणूक; ‘क्रिसिल रेटिंग्ज’चे अनुमान

बिडकीन व शेंद्रा येथील भूखंड वाटपाबाबत नव्याने निविदाही प्रसिद्ध करण्यात आल्या असून, या वेळी अनेक उद्योजक या भागात गुंतवणुकीस पुढाकार घेतील, असे सांगण्यात येत आहे. एथर एनर्जीच्या वतीने येथील पायाभूत सुविधांची पाहणी यापूर्वीच करण्यात आली आहे. शेंद्रा व बिडकीन या दोन्ही औद्योगिक वसाहतींमध्ये जागा उपलब्ध असल्याचे कंपनीला कळविण्यात आले होते. एथर एनर्जीने छत्रपती संभाजीनगरमध्ये गुंतवणूक करावी यासाठी शहरातील औद्योगिक संघटनाही प्रयत्न करत होत्या. पायाभूत सुविधांची माहितीही विविध स्तरांवर पोहोचविण्याचे काम उद्योजकांकडून केले जात होते. त्यामुळे येत्या काही दिवसांत दुचाकींच्या (ई-स्कूटर) क्षेत्रातील अग्रनामांकित कंपनी गुंतवणूक करण्यासाठी पुढाकार घेत असल्याचे सांगण्यात येत आहे.

बंगळूरुस्थित या कंपनीचे सध्या तमिळनाडूतील होसूरमध्ये दोन उत्पादन प्रकल्प आहेत. इलेक्ट्रिक वाहने आणि चार्जिंगच्या पायाभूत सुविधांची रचना, निर्मिती, सेवा, विकास यांसह संगणक प्रणाली व्यवस्थापनाचे काम कंपनी करते. बॅटरीशी निगडित विविध सेवाही कंपनीकडून दिल्या जातात. ई-स्कूटरची वाढती मागणी पाहता एथर एनर्जीने तिसऱ्या उत्पादन प्रकल्पासाठी पाऊल टाकले आहे.