मुंबई: शापूरजी पालनजी समूहातील पायाभूत सुविधा विकासातील ॲफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडच्या प्रारंभिक समभाग विक्रीसाठी (आयपीओ) प्रति समभाग ४४० ते ४६३ रुपयांचा किंमतपट्टा निश्चित करण्यात आला आहे. या माध्यमातून कंपनीला ५,४३० कोटी रुपयांचा निधी उभारला जाणे अपेक्षित आहे. ही समभाग विक्री शुक्रवार, २५ ऑक्टोबरला खुली होत असून, २९ ऑक्टोबरपर्यंत गुंतवणूकदारांना समभागांसाठी बोली लावता येईल.

हेही वाचा >>> मुंबईसह महाराष्ट्राच्या स्थावर मालमत्ता प्रकल्पांत २,००० कोटींच्या गुंतवणुकीचे एम्मार इंडियाचे नियोजन

या आयपीओच्या माध्यमातून ॲफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चरचे विद्यमान भागधारक त्यांच्याकडील समभाग विकणार (ओएफएस) असून, नवीन समभागांचीही विक्री केली जाणार आहे. यात १,२५० कोटी रुपये नवीन समभाग विकून आणि ओएफएसच्या माध्यमातून ४,१८० कोटी रुपयांचा निधी उभारला जाणार आहे. आयपीओ-पूर्व कंपनीने ३,००० कोटी रुपये गुंतवणूकदारांकडून उभे केले आहेत. आयपीओमध्ये सहभागासाठी किरकोळ वैयक्तिक गुंतवणूकदार किमान ३२ समभाग आणि त्यानंतर त्याच पटीत समभागांसाठी बोली लावणारा अर्ज दाखल करू शकतील.

हेही वाचा >>> इंडेल मनी रोखे विक्रीतून १५० कोटी उभारणार; ६६ महिन्यांत गुंतवणुकीवर दुपटीने लाभ

सागरी व औद्योगिक पायाभूत सुविधा, वाहतूक, नागरी पायाभूत सुविधा आणि तेल नैसर्गिक वायू क्षेत्रात विस्तार असलेल्या ॲफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चरकडे मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन या महत्त्वाकांक्षी प्रकल्पात २१ किलोमीटर लांबीच्या बोगदा मार्गाचे महत्त्वपूर्ण काम आहे. या आयपीओच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या निधीपैकी ८० कोटी रुपयांचा वापर बांधकाम उपकरणांच्या खरेदीसाठी भांडवली खर्च म्हणून केला जाईल. याचबरोबर दीर्घकालीन खेळत्या भांडवलासाठी ३२० कोटी रुपये आणि कर्जफेडीसाठी ६०० कोटी रुपयांचा वापर केला जाईल.