लोकसत्ता खास प्रतिनिधी

पुणे : देशभरात घरांच्या किमतीत वाढ झाल्याने परवडणाऱ्या घरांच्या विक्रीत घट झाली आहे. यंदा पहिल्या सहामाहीत एकूण घरांच्या विक्रीत परवडणाऱ्या घरांचे प्रमाण २० टक्क्यांवर आले आहे. विशेष म्हणजे, देशात परवडणाऱ्या घरांच्या विक्रीत मुंबई आणि पुण्याचा वाटा सर्वाधिक आहे.

मालमत्ता क्षेत्रातील सल्लागार संस्था ‘अनारॉक रिसर्च’ने देशातील गृहनिर्माण क्षेत्राचा जानेवारी ते जून या सहामाहीतील अहवाल जाहीर केला आहे. यात देशांतील दिल्ली, मुंबई, पुणे, बंगळुरू, चेन्नई, कोलकता आणि हैदराबाद या सात महानगरांचा आढावा घेण्यात आला आहे. या अहवालानुसार, पहिल्या सहामाहीत देशात २ लाख २९ हजार घरांची विक्री झाली. यात परवडणाऱ्या म्हणजेच ४० लाख रुपये किमतीच्या आतील घरांची संख्या ४६ हजार ६५० आहे. पहिल्या सहामाहीत एकूण विक्रीत परवडणाऱ्या घरांचे प्रमाण २० टक्क्यांवर आले आहे. मागील वर्षी पहिल्या सहामाहीत हे प्रमाण ३१ टक्के होते. मागील वर्षी पहिल्या सहामाहीत १ लाख ८४ हजार घरांची विक्री झाली आणि त्यात परवडणाऱ्या घरांची संख्या ५७ हजार ६० होती. यंदा पहिल्या सहामाहीत एकूण उपलब्ध घरांमध्ये परवडणाऱ्या घरांची संख्या १८ टक्क्यांवर आली आहे.

परवडणाऱ्या घरांची सर्वाधिक विक्री मुंबई आणि पुण्यात झाली आहे. परवडणाऱ्या घरांच्या विक्रीत मुंबईचा सर्वाधिक ३७ टक्के वाटा आहे. पुण्याचा २१ टक्के आणि दिल्लीचा १९ टक्के वाटा आहे. परवडणाऱ्या घरांची सर्वांत कमी विक्री हैदराबादमध्ये झाली असून, एकूण विक्रीतील वाटा केवळ २ टक्के आहे. परवडणाऱ्या घरांच्या विक्रीत घट होण्यामागे घरांच्या वाढलेल्या किमती कारणीभूत आहेत. जमिनीच्या वाढलेल्या भावामुळे परवडणाऱ्या घरांचा पुरवठा कमी झाला आहे. याचबरोबर अपुऱ्या पायाभूत सुविधा आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जात नसल्याने परवडणाऱ्या घरांची बांधणी कमी झाली आहे, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

कोट मागील वर्षभरापासून घरांच्या किमतीत वाढ होत आहे. त्यामुळे परवडणारी घरे घेणारे ग्राहक खरेदीचा निर्णय लांबणीवर टाकत आहेत. याच वेळी जमिनीच्या किमती वाढल्याने विकसक परवडणाऱ्या घरांऐवजी मध्यम अथवा आलिशान घरांच्या प्रकल्पाची उभारणी करण्यास पसंती देत आहेत. – अनुज पुरी, अध्यक्ष, अनारॉक ग्रुप

परवडणाऱ्या घरांची विक्री (जानेवारी ते जून २०२३)

शहर – घरे

मुंबई – १७,४७०

पुणे – ९,७००

दिल्ली – ८,६८०

कोलकता – ४,९९०

बंगळुरू – ३,२७०

चेन्नई – १,८२०

हैदराबाद – ७२०

एकूण – ४६,६५०