नवी दिल्ली : रिलायन्स इंडस्ट्रीजचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स जिओने भारतात स्टारलिंक उपग्रहाधारीत इंटरनेट सेवा आणण्यासाठी एलॉन मस्क यांच्या स्पेसएक्ससोबत कराराची बुधवारी घोषणा केली.
मस्क यांच्या उपक्रमाला ध्वनिलहरी अर्थात स्पेक्ट्रम कसा द्यावा यावरून अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या वादानंतर हे आश्चर्यकारक पाऊल उचलले गेले आहे. जिओची प्रतिस्पर्धी कंपनी असलेल्या सुनील भारती मित्तल यांच्या भारती एअरटेलने स्पेसएक्ससोबत अशाच प्रकारच्या भागीदारी करारावर मंगळवारी स्वाक्षरी केली आहे.
प्रतिस्पर्धी जिओ आणि एअरटेल यांनी भारतात उपग्रहाधारीत (सॅटेलाइट) सेवांसाठी स्पेक्ट्रम देण्यासाठी लिलावाची मागणी करण्यासाठी एकत्र आले होते. जगभरात या संबंधाने रूळलेल्या प्रथेनुसार, स्पेक्ट्रमचे प्रशासकीय वाटप झाल्यास, मस्क यांना भूतकाळात लिलावाद्वारे दिलेल्या किंमतीपेक्षा कमी किमतीत ध्वनीलहरी प्राप्त होतील, अशी भीती या कंपन्यांना सतावत होती.
जिओ त्यांच्या किरकोळ सेवा विक्री केंद्र तसेच त्यांच्या ऑनलाइन मंचाच्या माध्यमातून स्टारलिंक उपकरणांची विक्री करेल. या कराराद्वारे,जगातील सर्वात मोठ्या मोबाइल सेवा प्रदाता म्हणून जिओच्या स्थानावर शिक्कामोर्तब होण्यासह, भारतातील सर्वात ग्रामीण आणि दुर्गम प्रदेशांसह देशभरात ब्रॉडबँड सेवा पुरवली जाईल. प्रत्येक भारतीयाला, तो कुठेही राहत असला तरी, परवडणाऱ्या दरात आणि वेगवान ब्रॉडबँडची सुविधा उपलब्ध करून देणे ही जिओची सर्वोच्च प्राथमिकता आहे, असे रिलायन्स जिओचे समूह मुख्याधिकारी मॅथ्यू ओमेन म्हणाले.
मस्कचा वाढता राजकीय, व्यावसायिक प्रभाव
सध्याच्या अमेरिकी प्रशासनात मस्कचा वाढता राजकीय आणि व्यावसायिक प्रभाव अधोरेखित होतो. डिपार्टमेंट ऑफ गव्हर्नमेंट एफिशियन्सीचे प्रमुख म्हणून, जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती अमेरिकी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या दुसऱ्या कार्यकाळात एक प्रभावी शक्ती म्हणून ते उदयास आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वॉशिंग्टनमध्ये मस्क यांची भेट घेतल्यानंतर काही आठवड्यांनंतर एअरटेल आणि जिओने हे करार केले आहेत.
या दौऱ्यादरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्रम्प यांचीही भेट घेतली होती, ज्यांच्या प्रशासनाने भारतासह इतर देशांविरुद्धच्या व्यापारशुल्कामध्ये वाढ केली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक अंबानी हे अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्पच्या उद्घाटन समारंभात आमंत्रित काही निवडक व्यक्तींपैकी एक होते.