चांद्रयान ३ च्या यशाचा जल्लोष अद्यापही संपलेला नसून संपूर्ण देश या उत्सवात रंगला आहे. चांद्रयान ३ च्या यशानंतर आता इतर पैलूंवर चर्चा केली जात आहे. गुगल ट्रेंड्सनुसार, भारतातील ‘स्पेस’ हा शब्द २३ ऑगस्ट रोजी संध्याकाळी ६:३० वाजता (चांद्रयान ३ च्या चंद्रावर उतरल्यानंतर २६ मिनिटे) इंटरनेटवर सर्वाधिक सर्च केला गेला आहे. ‘स्पेस’बरोबरच ‘स्पेस जॉब्स’, ‘इस्रो जॉब्स’ आणि ‘स्पेस करिअर्स’ सारखे सर्च कीवर्ड देखील २३-२४ ऑगस्टच्या सुमारास शिखरावर पोहोचले होते. याचा अर्थ चांद्रयान ३ ने हजारो भारतीयांना बहुतेक विद्यार्थ्यांना अंतराळ उद्योगात करिअर करण्याचा विचार करण्यास भाग पाडले आहे.
आश्चर्यकारक बाब म्हणजे इस्रोच्या नुकत्याच आलेल्या नोटमध्ये एक मोठा खुलासा झाला आहे. इस्रो आणि त्याच्याशी निगडीत खासगी क्षेत्राकडून सुरू असलेल्या उपक्रमांमुळे देशात हजारो नोकऱ्या निर्माण झाल्याचं त्यांनी म्हटलं आहे. चांद्रयान ३ च्या यशामुळे भारतीय खासगी अवकाश क्षेत्रात अधिक नोकऱ्या निर्माण होऊ शकतात, असंही तज्ज्ञ सांगतात. तज्ञांच्या मते, देशात डझनहून अधिक कंपन्या आणि ५०० हून अधिक लघु मध्यम उद्योग आहेत, जे संरक्षण आणि एरोस्पेसशी संबंधित व्यवसायात गुंतलेले आहेत. इस्रो सध्या आणखी अंतराळ मोहिमांवर काम करीत आहे किंवा सुरू करणार आहे. अशा परिस्थितीत या क्षेत्रात आणखी नोकऱ्या निर्माण होणार आहेत. आपण प्रथम इस्रोच्या नोटची चर्चा करूया, ज्यामध्ये त्यांनी रोजगार निर्मितीबद्दल सांगितले आहे.
हेही वाचाः विश्लेषण: दिवाळीपर्यंत सोने ६२००० रुपयांवर जाण्याची शक्यता, सोन्याच्या दरवाढीची कारणे काय?
आयआयटी गुवाहाटीच्या भौतिकशास्त्र विभागाचे प्राध्यापक संतब्रत दास यांनी फायनान्शिअल एक्स्प्रेसला महत्त्वाची माहिती दिलीय. अंतराळ उद्योगात शेकडो नोकऱ्या आहेत. अर्थात नोकरीच्या अनेक संधी STEM (विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित) क्षेत्राशी संबंधित आहेत, विशेष म्हणजे प्रत्येकासाठी इथे जागा आहे,” असंही ते म्हणालेत. “अंतराळ उद्योगाला लेखापाल (accountants), व्यवस्थापक, सांख्यिकीशास्त्रज्ञां (statisticians)ची आवश्यकता असते आणि एखादं वाढणारं क्षेत्र असल्यास तिथे सर्व प्रकारच्या नोकरीची आपल्याला ऑफर मिळते,” असंही ते सांगतात.
इस्रोने नोकऱ्यांबाबत दिले मोठे विधान
फायनान्शिअल एक्स्प्रेसच्या अहवालानुसार, अंतराळ उद्योग भारतात किती नोकऱ्या निर्माण करेल याविषयी कोणताही अद्ययावत अहवाल नाही. तसेच ISRO ने अलीकडेच एका नोटमध्ये म्हटले आहे की, त्यांच्या सततच्या अवकाश हालचाली आणि मोहिमांमुळे ५०० हून अधिक MSMEs, PSUs आणि मोठ्या खासगी उद्योगांसह एक इकोसिस्टम तयार केली गेली आहे. अंतराळ कार्यक्रमात भारत महत्त्वपूर्ण योगदान देत आहे. अंतराळ हालचालींमध्ये उद्योगांच्या सहभागामुळे देशातील सुमारे ४५००० लोकांसाठी नोकऱ्या निर्माण झाल्या आहेत. संरक्षण उत्पादन, दूरसंचार, साहित्य, रसायन आणि अभियांत्रिकी अशा अनेक क्षेत्रांना याचा खूप फायदा झाला आहे.
हेही वाचाः आता भारतातून बासमती तांदळाच्या निर्यातीवरही बंदी; मोदी सरकारचा मोठा निर्णय
‘या’ उद्योगांमध्ये मोठ्या प्रमाणात नोकऱ्या उत्पन्न
आयआयटी जोधपूरचे प्रोफेसर अरुण कुमार यांनी फायनान्शिअलच्या अहवालात म्हटले आहे की, इस्रो व्यतिरिक्त नवीन युगाच्या स्टार्ट अप्सच्या आगमनामुळे अवकाश उद्योगात अनेक नोकऱ्या निर्माण होणार आहेत. खासगी क्षेत्र उपग्रह निर्मिती तसेच स्पेस सॉफ्टवेअर सारखे अॅप्स विकसित करण्यासह अनेक संधी उपलब्ध करून देत आहे. विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवावे की, अवकाश उद्योगासाठी उपयुक्त असलेल्या नोकऱ्या क्षेपणास्त्र, रडार आणि संरक्षण क्षेत्रासंबंधितही असू शकतात. जर त्यांना अवकाश उद्योगात नोकऱ्या मिळू शकल्या नाहीत, तर संबंधित उद्योगांमध्ये आणखी अनेक नोकऱ्या नक्कीच मिळतील, असंही त्यांचं म्हणणं आहे.
परदेशात नोकरीची संधी
फायनान्शिअल एक्सप्रेसकडे तज्ज्ञ म्हणाले की, स्पेस हा वाढणारा उद्योग असल्याने डझनभर देशांमध्ये नोकऱ्या आहेत. आमच्या संशोधनानुसार जगभरात ७७ अंतराळ संस्था आहेत आणि त्यापैकी १६ मध्ये प्रक्षेपण क्षमता आहे. तुमच्याकडे एक किंवा दोन अतिरिक्त कौशल्ये असल्यास परदेशी भाषा जाणून घेऊन तुम्ही जगात कुठेही काम करू शकता.