संपूर्ण देशात टोमॅटो महागल्यानं गृहिणींचं बजेट अक्षरशः कोलमडलं आहे. आता यात आणखी भर पडत असून, आले महाग झाले आहे. आल्याचा दर ३०० रुपये किलोच्या पुढे गेला आहे. कर्नाटकात एक किलो आल्यासाठी लोकांना ४०० रुपयांपर्यंत खर्च करावा लागतोय. त्यामुळे मांसाहार करणारे आणि जेवणात आलं वापरणाऱ्यांचं बजेट बिघडले आहे. विशेष म्हणजे कर्नाटक हे देशातील दुसरे सर्वात मोठे आले उत्पादक राज्य आहे. असे असतानाही दर दिवसेंदिवस वाढत आहेत. त्याचबरोबर येत्या काही दिवसांत त्याचे भाव आणखी वाढू शकतात, असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.
सध्या कर्नाटकात अनेक ठिकाणी किरकोळ बाजारात आले ३०० ते ४०० रुपये किलोने विकले जात आहे. कर्नाटक राज्य रायथा संघाच्या म्हैसूर जिल्हा युनिटचे म्हणणे आहे की, राज्यात ६० किलो आल्याची पिशवी ११,००० रुपयांना विकली जात आहे. तर गेल्या वर्षीपर्यंत त्याची किंमत २००० ते ३००० हजार रुपये होती. त्यामुळेच घाऊक बाजारात भाव वाढल्याने किरकोळ बाजारातील भाव आपोआपच अनेक पटींनी वाढले आहेत.
हेही वाचाः Money Mantra : क्रेडिट कार्डाचे बिल ठरतेय डोकेदुखी? ‘या’ पद्धतीनं पटकन भरा अन् CIBIL स्कोर सुधारा
महागाई शेतकऱ्यांसाठी वरदान ठरतेय
मात्र, आल्याच्या दरात झालेली वाढ म्हैसूर आणि मलनाड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी वरदान ठरत आहे. येथे शेतकरी आले विकून मोठी कमाई करीत आहेत. कारण या दोन्ही जिल्ह्यांत शेतकरी आल्याची लागवड मोठ्या प्रमाणावर करतात. दुसरीकडे आले उत्पादक होसुर कुमार सांगतात की, गेल्या दशकात आल्याच्या किमतीत एवढी मोठी झेप कधीच नोंदवली गेली नव्हती. ही एक अभूतपूर्व घटना आहे.
टोमॅटोसह ‘या’ भाज्या महागल्या
विशेष म्हणजे आल्याबरोबरच इतर अनेक भाज्या महागल्या आहेत. ६० रुपये किलोने मिळणारी कोथिंबीर आता २०० रुपये किलो झाली आहे. तसेच २० ते ३० रुपये किलोने विकल्या जाणाऱ्या टोमॅटोचा भाव आता देशभरात १५० ते २५० रुपये किलो झाला आहे. हिरवी मिरचीही २०० रुपये किलोने विकली जात आहे. त्यामुळेच देशात आल्याबरोबरच हिरव्या भाज्यांच्या चोरीच्या घटनाही समोर येत आहेत. विशेष बाब म्हणजे कर्नाटकातील एका शेतकऱ्याने आपल्या शेतातून १.८ लाख रुपये किमतीचे आले चोरीला गेल्याची तक्रार दाखल केली आहे. याशिवाय इतरही अनेक शेतकऱ्यांनी चोरीच्या अशाच तक्रारी पोलिसांकडे केल्या आहेत.