Onion Price Hike : देशभरात टोमॅटोचे भाव गगनाला भिडले आहेत. कुठे टोमॅटो १२० रुपये किलोने विकला जात आहे, तर कुठे प्रतिकिलो २०० रुपयांच्या पुढे गेला आहे. काही ठिकाणी टोमॅटोच्या दरात दिलासा मिळाला असला तरी आता कांद्याच्या दरातही वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कांद्याच्या दरात विक्रमी वाढ होऊ शकते, असे एका अहवालात म्हटले आहे. सध्या कांद्याचा भाव प्रतिकिलो २८ ते ३२ रुपयांपर्यंत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कांदा किती महाग होऊ शकतो?

ऑगस्टअखेरीस किरकोळ बाजारात कांद्याच्या दरात विक्रमी वाढ होण्याची शक्यता आहे. पुरवठ्यात कमतरता असल्याने पुढील महिन्यात ही वाढ सुमारे ६० ते ७० रुपये प्रतिकिलो होण्याची शक्यता आहे. क्रिसिल मार्केट इंटेलिजन्स अँड अ‍ॅनालिटिक्सच्या अहवालानुसार, एवढी किंमत वाढल्यानंतरही या वाढलेल्या किमती २०२० च्या सर्वोच्च पातळीच्या तुलनेत खालीच राहणार आहेत.

किती दिवस भाव चढेच राहणार?

अहवालात असे म्हटले आहे की, रब्बी कांद्याचे शेल्फ लाइफ १-२ महिन्यांनी कमी झाल्यामुळे आणि यंदा फेब्रुवारी-मार्चमध्येच विक्री झाल्यामुळे खुल्या बाजारात रब्बीच्या कांद्याचा साठा सप्टेंबरऐवजी ऑगस्टच्या अखेरीस लक्षणीयरीत्या कमी होण्याची अपेक्षा आहे, त्यामुळे बाजारात पुरवठ्याची कमतरता होणार असून, भाव वाढण्याची शक्यता आहे.

हेही वाचाः भारताच्या तांदूळ निर्यातबंदीचा परिणाम, जगभरातील किमती १२ वर्षांच्या उच्चांकावर पोहोचल्या

जानेवारी ते मे या काळात कांद्याचे भाव कमी होते

ऑक्टोबरमध्ये नवीन कांद्याचे पीक आल्यावर भाव पुन्हा खाली येऊ शकतात. ऑक्‍टोबर-डिसेंबर या सणासुदीच्या महिन्यात किमतीतील चढ-उतार स्थिर राहण्याची अपेक्षा असल्याचे अहवालात म्हटले आहे. विशेष म्हणजे जानेवारी ते मे या काळात डाळी, धान्य आणि इतर भाज्या महागल्या होत्या, त्या काळात कांद्याच्या दराने लोकांना दिलासा दिला आहे.

हेही वाचाः ५२ सोन्याच्या बोटी, ३८ विमाने आणि शेकडो कार; जगातील सर्वात श्रीमंत राजा आहे तरी कोण? जाणून घ्या संपत्ती

कांद्याच्या पिकाची पेरणी कमी

कांद्याचे भाव कमी झाल्यामुळे शेतकऱ्यांनी यंदा कमी कांद्याची लागवड केली आहे, त्यामुळे या वर्षी क्षेत्रात ८ टक्क्यांनी घट होणार असून, कांद्याचे खरीप उत्पादन दरवर्षीच्या तुलनेत ५ टक्क्यांनी घटणार आहे. वार्षिक उत्पादन २९ दशलक्ष टन (एमएमटी) अपेक्षित आहे, जे गेल्या वर्षीच्या तुलनेत ७ टक्के जास्त आहे. त्यामुळे खरीप आणि रब्बी उत्पादन कमी असूनही यंदा पुरवठ्यात मोठी तूट येण्याची शक्यता नाही.

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: After tomato the price of onion will be tough now onion is likely to bring water to the eyes vrd
Show comments