पुणे : यंदा उसाच्या गळित हंगामापूर्वी ७६६ कोटी लिटर इथेनॉल उत्पादनाचा अंदाज होता. पण, निर्बंधांमुळे इतके उत्पादन होण्याची शक्यता नाही. राज्यातील खासगी आणि सहकारी साखर कारखान्यांना एप्रिलअखेर फक्त २.१ लाख टन साखरेपासून थेट इथेनॉल निर्मिती करता येणार आहे. त्यामुळे २०२४ मध्ये पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रणाचे प्रमाण १५ टक्क्यांवर नेण्याचे उद्दिष्ट गाठणे दुरापास्त होणार आहे.
वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशनने (विस्मा) दिलेल्या माहितीनुसार, केंद्र सरकारने १५ डिसेंबर रोजी दिलेल्या निर्देशांनुसार देशातील साखर कारखान्यांना एप्रिलअखेरपर्यंत १७ लाख टन साखरेपासून इथेनॉल निर्मिती करण्यास परवानगी आहे. तथापि १५ डिसेंबरपूर्वीच सुमारे ८.५० लाख टन साखरेपासून इथेनॉल निर्मिती करण्यात आली आहे. १५ डिसेंबरच्या सुधारित आदेशानंतर हंगामाच्या सुरुवातीस दिलेल्या कोट्यापैकी २५ टक्केच कोटा मंजूर करण्यात आला आहे. राज्यातील ३२ सहकारी आणि ४० खासगी कारखान्यांना एप्रिलपर्यंत २.१ लाख टन साखरेपासून इथेनॉल निर्मिती करता येणार आहे. याचा इथेनॉल उत्पादनावर थेट परिणाम होणार आहे. केंद्रीय अन्न मंत्रालयाच्या वतीने १५ जानेवारीला देशातील एकूण साखर उत्पादनाच्या स्थितीचा आढावा घेऊन अपेक्षित साखर उत्पादन झालेले असल्यास इथेनॉल उत्पादनासाठी वाढीव कोटा मंजूर होण्याची शक्यता असल्याचेही ‘विस्मा’ने म्हटले आहे. तरीही मागील वर्षाइतका कोटा मिळण्याची शक्यता नाही.
हेही वाचा – बँकांवरील अवलंबित्व कमी करा, बँकेतर वित्तीय कंपन्यांना रिझर्व्ह बँकेच्या सूचना
कठोर कारवाईचे आदेश
इथेनॉल उत्पादनाबाबत केंद्राने दिलेल्या निर्देशांचे कारखान्यांकडून योग्य पालन होते की नाही, यावर नियंत्रण ठेवण्याचे आदेश उत्पादन शुल्क विभागाला देण्यात आले आहेत. केंद्राने कारखानानिहाय इथेनॉल उत्पादनाचा कोटा ठरवून दिला आहे. रेक्टिफाइड स्पिरिट आणि एक्ट्रा न्यूट्रल अल्कोहोल तयार करण्यासाठी उसाचा रस किंवा बी हेवी मळीचा वापर करू नये, असे स्पष्ट आदेश आहेत. केंद्राच्या सक्त आदेशानंतर साखर कारखान्यांनीही आपल्या नियोजनात बदल केला आहे.
पेट्रोलियम कंपन्यांनाही आदेश
इथेनॉल पुरवठ्यासाठी (नोव्हेंबर २०२३ ते ऑक्टोबर २०२४) पेट्रोलियम कंपन्यांनी ८२५ कोटी लिटरची निविदा प्रसिद्ध केली होती. त्यापैकी एप्रिल २०२४ पर्यंत ५६२ कोटी लिटरच्या पुरवठ्याचे करार साखर कारखान्यांनी केले आहेत. पण, १५ डिसेंबरच्या निर्देशांनंतर ५६२ कोटी लिटरचा पुरवठा करणे शक्य दिसत नाही. त्या बाबतची सूचना केंद्राने पेट्रोलियम कंपन्यांना दिली आहे. त्यानुसार पेट्रोलियम कंपन्यांनीही आपल्या नियोजनात बदल केला आहे.
हेही वाचा – Share Market Today : ‘सेन्सेक्स’ची ७२ हजारांपुढे विक्रमी आगेकूच
इथेनॉल उत्पादन (कोटी लिटर)
२०१८-१९ – ३५५
२०१९-२० – ४२७
२०२०-२१ – ५२०
२०२१-२२ – ६०८
२०२२-२३ – ७१८
२०२३-२४ – ७६६ (हंगाम पूर्व अंदाज)
सरकारने मागील वर्षाच्या तुलनेत उसाचा रस किंवा पाकापासून फक्त २५ टक्केच इथेनॉल निर्मिती करण्याला परवानगी दिली आहे. त्यामुळे इथेनॉल निर्मितीला फटका बसला आहे. १५ जानेवारीच्या आढावा बैठकीत दिलासा मिळेल, अशी अपेक्षा आहे.- बी. बी. ठोंबरे, अध्यक्ष, विस्मा