मुंबई : उत्तर प्रदेशची अर्थव्यवस्था एक लाख कोटी डॉलरवर नेण्याचा निर्धार उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गुरुवारी मुंबईत आयोजित ‘रोड शो’मध्ये व्यक्त केला. माफिया आणि गुंडांचा बीमोड केल्याने राज्यात उद्योगांसाठी सुरक्षित वातावरण निर्माण झाले आहे. उद्योगपतींना किंवा कंत्राटदारांना खंडणीसाठी कोणी त्रास देणे सोडाच, राजकीय देणग्यांसाठीही जबरदस्ती करणार नाही, असा दिलासाही त्यांनी उद्योगजगताला दिला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असून नामांकित उद्योगपती आणि उद्योगसमूहांनी उत्तर प्रदेशात आर्थिक गुंतवणूक करावी. त्यांना सरकारचे संपूर्ण पाठबळ राहील, अशी ग्वाही देत आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशात बॉलीवूडला आमंत्रित केले. अनेक उद्योगपती, बँकर्स, वित्तीय संस्था, उद्योगसमूहांचे उच्चपदस्थांबरोबरच चित्रपट निर्माते, कलावंत, दिग्दर्शक आदींचीही भेट घेऊन त्यांना उत्तर प्रदेशात येण्याचे आवाहन केले.

उत्तर प्रदेश सरकारने १०-१२ फेब्रुवारीदरम्यान लखनौ येथे जागतिक गुंतवणूकदार परिषदेचे आयोजन केले असून गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी मुंबईसह देशातील मोठय़ा शहरांमध्ये ‘रोड शो’चे आयोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या उपस्थितीत मुंबईत ताजमहाल हॉटेलमध्ये आयोजित रोड शोसाठी नामांकित उद्योगपती आणि कंपन्यांचे उच्चपदस्थ अधिकारी उपस्थित होते. योगी आदित्यनाथ यांनी ज्येष्ठ उद्योगपती मुकेश अंबानीसह नामांकित उद्योगपतींशी चर्चा केली आणि कंपन्या, बँका, वित्तसंस्थांचे अधिकारी यांच्याबरोबर दिवसभरात १७ हून अधिक बैठका घेतल्या.

उत्तर प्रदेशात गेल्या काही काळात ७.१० लाख कोटी रुपये गुंतवणुकीचे प्रस्ताव आले असून फेब्रुवारीतील परिषदेपर्यंत १५ लाख कोटी रुपये गुंतवणुकीचे प्रस्ताव येण्याची अपेक्षा उत्तर प्रदेश सरकारला आहे. माफिया आणि गुंड टोळय़ांचा बंदोबस्त केल्याने गेल्या पाच वर्षांत उत्तर प्रदेशात चार लाख कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक असलेले उद्योग प्रत्यक्षात सुरू झाले, असे सांगून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले, करोनाकाळात तेथे एकही उद्योग बंद पडला नाही. उत्तर प्रदेशात ९६ लाखांहून अधिक सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योग (एमएसएमई) असून देशातील सर्वाधिक लोकसंख्येचे हे राज्य आहे. देशातील २० टक्के अन्नधान्य उत्पादन उत्तर प्रदेशात होत असल्याने अन्नप्रक्रिया उद्योगाला मोठा वाव आहे. पाच आंतरराष्ट्रीय विमानतळ असलेले उत्तर प्रदेश हे देशातील सर्वात मोठे राज्य आहे. समुद्रकिनारा नसला तरी राज्यांतर्गत जलवाहतूक व्यवस्था आहे. बाजारपेठेला जोडणारे रस्ते, पूर्वाचल, बुंदेलखंड यांसारखे द्रुतगती महामार्ग आहेत. गंगा व प्रयागराज द्रुतगती महामार्गाचे व दोन संरक्षण कॉरिडॉरचे काम सुरू आहे. माझ्या सरकारने जेव्हा २०१७ मध्ये राज्याची सूत्रे हाती घेतली, तेव्हा राज्याची आर्थिक स्थिती नाजूक होती. त्यामुळे बँका, वित्तीय संस्थाही मदतीसाठी तयार नव्हत्या; पण आता उत्तर प्रदेशचा अर्थसंकल्प दुपटीने वाढला असून महसुली आधिक्य असलेले राज्य आहे.

उत्तर प्रदेशात गुंतवणुकीसाठी प्रस्ताव सादर केल्यावर किंवा सामंजस्य करार केल्यावर राज्य सरकारची संपूर्ण मदत मिळेल. लालफितीचा कोणताही त्रास किंवा कोणाचाही हस्तक्षेप होणार नाही व तातडीने आवश्यक मंजुऱ्या मिळतील. मुख्यमंत्री कार्यालयाचे त्यावर लक्ष राहील व उद्योगांना संपूर्ण सहकार्य राहील, असे आदित्यनाथ यांनी नमूद केले.

पर्यटन क्षेत्राला आमचे प्राधान्य असून ते विकसित करण्यासाठी बँकांचे सहकार्य अपेक्षित आहे. पुराणकालीन महत्त्व असलेली मंदिरे, परिसर येथे

धार्मिक पर्यटनाला मोठा वाव आहे. अयोध्येतील राम मंदिराचे स्वप्न आता साकार होत असून हे काम लवकरच पूर्ण होईल, असे आदित्यनाथ यांनी सांगितले.

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aims to make uttar pradesh one trillion dollar economy says yogi adityanath zws
Show comments