टाटा समूहाने अधिग्रहित केलेल्या एअर इंडियाने ८५ एअरबस विमानांसाठी मागणी नव्याने नोंदवल्याचे बुधवारी रात्री माहीतगार सूत्रांनी स्पष्ट केले. शिवाय स्पर्धक बोईंगकडून गेल्या वर्षी नोंदविलेल्या मागणीहून अधिक प्रमाणात विमानांची खरेदी या हवाई सेवेकडून केली जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.

टाटा समूहाचा प्रवासी विमान सेवेत महत्त्वाकांक्षी पुन:प्रवेश ज्यांच्या नेतृत्वात झाला, ते समूहाचे माजी अध्यक्ष रतन टाटा यांच्या निधनामुळे शोकाकुल वातावरण असल्याने गुरुवारी प्रत्यक्ष एअर इंडिया अथवा एअरबस यापैकी कुणीही विमान खरेदीच्या या व्यवहाराला दुजोरा दिलेला नाही. तथापि, एअरबसने बुधवारी उशिरा टाटा यांच्या निधनाच्या घोषणेपूर्वी, एका अज्ञात ग्राहकाने ए ३२० प्रकारातील ७५ विमाने आणि लांब पल्ल्याच्या ए ३५० प्रकारातील १० विमानांसाठी मागणी नोंदवल्याचे स्पष्ट केले आहे. तथापि, ही विमान खरेदी एअर इंडियाकडून झाली असल्याचे ‘ब्लूमबर्ग’ने तीन माहीतगार सूत्रांच्या हवाल्याने म्हटले आहे.

हेही वाचा : Who is N Chandrasekaran : रतन टाटा यांचा सर्वांत विश्वासू माणूस एन. चंद्रशेखरन कोण? शेतकरी कुटुंबात जन्म अन् ठरले सर्वांत जास्त पगार घेणारे व्यावसायिक अधिकारी

टाटा समूहाने तब्बल ७० वर्षांच्या अंतरानंतर एअर इंडियाची मालकी पुन्हा मिळविली तेव्हा रतन टाटा हे अध्यक्षपदावरून निवृत्त झाले होते. तरी त्यांच्या अध्यक्षपदाच्या कारकीर्दीतच टाटा समूहाने सिंगापूर एअरलाइन्स आणि एअरएशिया इंडिया यांच्याशी भागीदारी करीत हवाई सेवेत पंख पसरले होते. विस्तारा या नव्या सेवेसह टाटा समूहाने विमानोड्डाण क्षेत्रातील संधींचा माग घेणे सुरू केले होते. एअर इंडियाच्या संपादनासह, सात दशके सरकारी अंमलाखाली राहिलेल्या कंपनीच्या पुनर्रचनेच्या हाती घेतलेल्या नियोजनांनुसार टाटा समूहाने तब्बल ४७० विमानांच्या खरेदीचा महाकाय प्रकल्प २०२२ मध्ये जाहीर केला आहे. जगातील कोणत्याही विमाननिर्मात्या कंपनीला इतकी मोठी मागणी ठरलेल्या कालावधीत पूर्ण करणे शक्य नसल्याने, एअरबस आणि बोईंग या दोन अग्रणी कंपन्यांत ती अनुक्रमे २५० आणि २२० विमाने अशी विभागण्यात आली. त्या व्यवहाराच्या अंगाने प्राथमिक कार्यादेश बुधवारी मार्गी लागला की नव्याने मागणी नोंदविली गेली याचाही अधिकृतपणे खुलासा होऊ शकलेला नाही.