लोकसत्ता व्यापार प्रतिनिधी
मुंबई: टाटा समूहाची कंपनी एअर इंडियामध्ये लवकरच मोठ्या प्रमाणात भरती मोहीम सुरू केली जाऊ शकते. कंपनीने अलीकडेच एअरबस आणि बोईंग यांना एकूण ४७० विमानांच्या खरेदीचे करार केले असून, ताफ्यात भर पडणाऱ्या नवीन विमानांची ही संख्या पाहता कंपनीला ६,५०० हून अधिक वैमानिकांची नियुक्ती करावी लागेल, असे उद्योग सूत्रांचे म्हणणे आहे. याव्यतिरिक्त विमानातील कर्मचारीवृंद आणि परिरक्षण दलातील कर्मचाऱ्यांची संख्या ही वैमानिकांपेक्षा कितीतरी पटीने जास्त असेल. एअर इंडियाच्या एअरबस आणि बोईंगशी झालेल्या करारांन्वये ४७० विमानांची खरेदी केली जाणार आहे. याशिवाय या करारामध्ये आणखी ३७० विमाने खरेदी करण्याचा पर्यायही ठेवला गेला आहे. त्यामुळे एकूण ८४० विमानांच्या खरेदीचे एअर इंडियाचे नियोजन आहे, जे जगातील कोणत्याही विमानसेवेकडून आजवरची सर्वात मोठी विमान खरेदी ठरेल. एअर इंडियाने अधिक विमाने खरेदी करण्याचा पर्यायही वापरला तर कंपनीत नव्याने दाखल होणाऱ्या वैमानिक आणि कर्मचारीवृंदाची संख्या आणखी मोठी असेल. त्या स्थितीत एअर इंडियाला आणखी मोठ्या प्रमाणात भरती मोहीम चालवावी लागेल, असे मानले जाते.
तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, एअर इंडियाने नुकतेच एअरबसकडून खरीदल्या जाणाऱ्या बहुतेक विमानांचा वापर लांब पल्ल्याच्या उड्डाणांसाठी केला जाईल. कमांडर आणि फर्स्ट ऑफिसर्ससह या प्रत्येक विमानासाठी २६ ते ३० वैमानिकांची आवश्यकता असेल. त्यामुळे सध्या सेवेत असलेल्या वैमानिक आणि अन्य कर्मचाऱ्यांच्या तुलनेत नव्याने दाखल होणाऱ्या वैमानिक व अन्य प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची संख्या जवळपास तिपटीने वाढू शकेल, असेही म्हटले जात आहे.
टाटांच्या सर्व कंपन्यांत ३,००० हून अधिक वैमानिक
एअर इंडियाच्या ताफ्यात सध्या ११३ विमाने आहेत आणि सुमारे १६०० वैमानिक सेवेत आहेत. एअर इंडियाच्या दोन उपकंपन्या, एअर इंडिया एक्स्प्रेस आणि एअरएशिया इंडियाकडे एकूण ५४ विमाने आहेत, ज्यांच्या उड्डाणासाठी त्या कंपन्यांच्या सेवेत जवळपास ८५० वैमानिक आहेत. याशिवाय टाटा समूहाच्या संयुक्त भागीदारीत सुरू असलेल्या विस्ताराच्या ताफ्यातील ५३ विमानांसाठी आणखी ६०० वैमानिक आहेत. अशाप्रकारे, एअर इंडिया, एअर इंडिया एक्सप्रेस, विस्तारा आणि एअरएशिया इंडिया या टाटा समूहाच्या सर्व विमान कंपन्यांकडे मिळून एकूण ३,००० हून अधिक वैमानिक कार्यरत आहेत, ज्यांच्याकडून ताफ्यातील २२० विमाने उडविली जातात.
प्रशिक्षण प्रबोधिनीचीही योजना?
एअर इंडियाचे माजी वाणिज्य संचालक पंकज श्रीवास्तव यांच्या मते, एअर इंडिया एवढ्या मोठ्या प्रमाणात विमाने खरेदी करत असताना, त्यांनी आवश्यक वैमानिक आणि कर्मचारीवृंदाच्या भरतीची योजनादेखील तपशिलाने आखलेली असावी. खरेदी केली जाणारी विमाने प्रत्यक्ष ताफ्यात सामील होण्यासाठी लागणारा वेळ हा कंपनीला वैमानिकांच्या भरतीसाठी आणि ‘टाइप रेटिंग’साठी वापरता येऊ शकेल. ‘टाइप रेटिंग’ हे एक विशेष प्रकारचे प्रशिक्षण आहे, जे पूर्ण केल्यानंतरच व्यावसायिक वैमानिक परवाना (सीपीएल) धारण करणारा वैमानिक हा विशिष्ट विमान उडवण्यास पात्र ठरतो. यासाठी मोठ्या प्रमाणात ‘फ्लाइट सिम्युलेटर’चीही आवश्यकता आहे. उल्लेखनीय म्हणजे एअर इंडियाने विमानांच्या खरेदी कराराच्या घोषणेआधी वर्षारंभी वैमानिक प्रशिक्षण प्रबोधिनी स्थापन करण्याची घोषणाही केली होती.