राम मंदिराच्या उद्घाटनाची जय्यत तयारी सुरू झाली आहे. राम मंदिराबाबत लोकांमध्ये प्रचंड उत्साह आहे. विशेष म्हणजे रामलल्लाच्या अभिषेकापूर्वीच विमानाचे भाडेही गगनाला भिडले आहे. अयोध्येला जाणाऱ्या विमानांचे भाडे अनेक आंतरराष्ट्रीय मार्गांवरील विमानांच्या तिकिटापेक्षा जास्त झाले आहे. त्यामुळे आता सिंगापूर आणि बँकॉकला जाण्यापेक्षा अयोध्येला जाणे महाग झाले आहे.
२२ जानेवारीला राम मंदिराच्या उद्घाटनापूर्वीच पर्यटकांची शहरात गर्दी होऊ लागली आहे. याचा परिणाम हॉटेल, ट्रेन आणि आता विमान भाड्यावर होत आहे. १९ जानेवारीचे मुंबई ते अयोध्येचे तिकीट पाहिल्यास इंडिगो फ्लाइटचे भाडे २०,७०० रुपये दाखवले आहे. त्याचप्रमाणे २० जानेवारीच्या विमान प्रवासाचे भाडेही सुमारे २० हजार रुपये असल्याचे पाहायला मिळत आहे. जवळपास सर्वच विमान कंपन्यांची हीच अवस्था आहे.
सिंगापूर फ्लाइट स्वस्त आहेत
फायनान्शियल एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, अयोध्येला जाणारे विमान भाडे अनेक आंतरराष्ट्रीय मार्गावरील भाड्यापेक्षा जास्त आहे. १९ जानेवारीच्याच मुंबई ते सिंगापूरच्या विमानाची तिकिटे पाहिली असता एअर इंडियाच्या थेट फ्लाइटचे भाडे १०,९८७ रुपये दाखवण्यात आले आहे. त्याचप्रमाणे १९ जानेवारी रोजी मुंबई ते बँकॉक थेट विमानाचे भाडे १३,८०० रुपये आहे.
पंतप्रधान मोदींनी विमानतळाचे केले उद्घाटन
अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनापूर्वी नवीन विमानतळ तयार झाले आहे. या विमानतळाला महर्षि वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळ असे नाव देण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नुकतेच या विमानतळाचे उद्घाटन करण्यात आले. सध्या एअर इंडिया एक्स्प्रेस आणि इंडिगो या दोनच विमान कंपन्यांनी अयोध्येसाठी उड्डाणे चालवण्याची घोषणा केली आहे.
व्यावसायिक कार्यात तेजी
मंदिराच्या उद्घाटनापूर्वी अयोध्येत अनेक प्रकारच्या व्यावसायिक कामांची उलाढाल पाहायला मिळत आहे. आगामी काळात संभाव्य मागणी आणि प्रचंड पर्यटन बाजारपेठ या अपेक्षेने अनेक कंपन्या तयारी करत आहेत. हॉस्पिटॅलिटी फर्म ओयोचे संस्थापक रितेश अग्रवाल यांनी आठवड्यापूर्वी सांगितले होते की, लोक अयोध्येसाठी मोठ्या प्रमाणावर हॉटेल्स शोधत आहेत. गोव्यासारखी पर्यटन स्थळे अयोध्येपेक्षा मागे पडल्याचं सध्या चित्र आहे.