वृत्तसंस्था, नवी दिल्ली
करोना काळातील २०२१ सालच्या दूरसंचार सुधारणा पॅकेजअंतर्गत भारती एअरटेलने तिची स्थगित सरकारी देणी ही समभागांत रूपांतरित करण्यासाठी दूरसंचार विभागाशी औपचारिक संपर्क साधला आहे, असे सरकारी सूत्रांनी गुरुवारी सूचित केले. दूरसंचार विभागाला दिलेल्या ताज्या पत्रव्यवहारात, थकबाकीचे समभाग रूपांतरणाची समान संधी मिळावी यासाठी ती आग्रही आहे.केंद्र सरकारने व्होडाफोन आयडियाने (व्हीआय) थकविलेल्या देणींच्या मोबदल्यात त्या कंपनीत आपला भागभांडवली हिस्सा ४९ टक्क्यांपेक्षा जास्त वाढविल्याच्या पार्श्वभूमीवर, एअरटेलने हे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे.
सुधारणा पॅकेजनुसार सर्वच कंपन्या अर्ज करू शकतात. मागणीचे योग्य मूल्यांकन केल्यानंतर सरकार निर्णय घेईल आणि कोणत्याही नवीन समभाग रूपांतरणाचा निर्णय प्रकरण तपासूनच घेतला जाईल, असे एअरटेलकडून आलेल्या आर्जवाला दुजोरा देत सरकारी सूत्रांनी स्पष्ट केले. तथापि एअरटेलने असा कोणताही विनंती अर्ज केल्याची अधिकृतपणे पुष्ठी केलेली नाही. सप्टेंबर २०२१ मध्ये जाहीर झालेल्या पॅकेजमुळे दूरसंचार कंपन्यांना स्पेक्ट्रम आणि एजीआर (समायोजित एकूण महसूल) थकबाकीची परतफेड चार वर्षांसाठी पुढे ढकलण्याची परवानगी मिळाली. शिवाय या स्थगित दायीत्वावरील व्याजाला भागभांडवल अर्थात समभागांत रूपांतरित करण्याचा पर्याय देखील कंपन्यांसाठी खुला करण्यात आला.
व्होडाफोन आयडिया आणि एअरटेल दोघांनीही या परतफेडीला स्थगितीचा फायदा घेतला. परंतु आतापर्यंत, फक्त व्होडाफोन आयडियाने समभाग रूपांतरणाचा पर्याय निवडला होता. या कर्जजर्जर कंपनीने थकविलेल्या ३६,९५० कोटी रुपयांचे सरकारने ३० मार्च रोजी भागभांडवली समभागांत रूपांतरण केले. ज्यामुळे व्होडाफोन आयडियामधील सरकारचा हिस्सा २२.६ टक्क्यांवरून आता अंदाजे ४९ टक्के झाला आहे. आता एअरटेललाही हा पर्याय खुणावत असल्याचे तिने केलेल्या अर्जावरून सूचित होते.
एअरटेलने गेल्या महिन्यात सरकारला ५,९८५ कोटी रुपयांची परतफेड केली, ज्यामुळे २०२४ मधील स्पेक्ट्रम लिलावासंबंधाने उच्च-रकमेची तिची देणी पूर्णपणे फेडली आहेत. या दायीत्व पूर्ततेनंतर एअरटेलवरील कर्ज ५२,००० कोटी रुपयांपर्यंत कमी झाले आहे, तर ज्यामुळे कर्ज परतफेडीचा खर्च ७.२२ टक्क्यांपर्यंत कमी झाला आहे. जर व्होडाफोनप्रमाणे केंद्राने एअरटेलचा प्रस्तावही मंजूर केला तर तिच्यावरील कर्जाचा भार लक्षणीयरीत्या कमी होण्यासह, तीव्र स्पर्धात्मक बाजारपेठेत चालू ५ जी गुंतवणुकीसाठी तिला अधिक आर्थिक लवचिकता मिळविता येऊ शकते.