वृत्तसंस्था, नवी दिल्ली

अदानी समूहाच्या मालकीच्या एसीसी आणि अंबुजा सिमेंट या कंपन्यांचे विलीनीकरण करण्याची कोणतीही योजना नाही. दोन्ही कंपन्या स्वतंत्रपणे सिमेंट विक्री करतील, अशी माहिती दोन्ही कंपन्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजय कपूर यांनी भागधारकांच्या बैठकीत दिली.

अदानी समूहाने हा मागील वर्षी या कंपन्यांमध्ये हिस्सेदारीसह देशातील दुसऱ्या क्रमांकाचा सिमेंट उत्पादक ठरला. देशात पहिल्या स्थानी अल्ट्राटेक सिमेंट कंपनी आहे. स्वित्झर्लंडमधील होल्सिमकडून एसीसी आणि अंबुजा या कंपन्या अदानी समूहाने १०.५ अब्ज डॉलरला ताब्यात घेतल्या. या दोन्ही कंपन्यांचे विलीनीकरण केले जाईल आणि तसे अदानी समूहाचे नियोजन असल्याची चर्चा सुरू होती.

हेही वाचा >>>इन्फोसिसला ५,९४५ कोटींचा तिमाही नफा

तथापि कपूर यांनी ही शक्यता फेटाळून लावत, दोन्ही ब्रँड स्वतंत्रपणे सिमेंट विक्री करतील, अशी भूमिका गुरुवारी मांडली. जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात हिंडेनबर्ग रिसर्चच्या अहवालानंतर अदानी समूहातील सर्वच कंपन्यांचे समभाग गडगडले. एसीसी आणि अंबुजा या दोन्ही कंपन्यांचे समभाग अद्याप त्या पडझडीतून सावरू शकलेले नाहीत. जानेवारीतील पातळीच्या तुलनेत एसीसीचे समभाग मूल्य २३ टक्के आणि अंबुजा १५.७ टक्के घसरले आहेत.

हेही वाचा >>>चार महिन्यांत १.५ लाख कोटींचा परकीय ओघ, जगभरात भारताचा उच्चांक

उत्पादन प्रकल्पांचा विस्तार

देशातील सिमेंटची मागणी ७ ते ८ टक्क्याने वाढत आहे. त्यामुळे पुढील २ ते ५ वर्षांत एसीसीकडून उत्पादन क्षमतेत १.६ कोटी टनांची वाढ केली जाणार आहे. कंपनीने मध्य प्रदेशातील अमेठा येथे नवीन प्रकल्प उभारला असून, लवकरच तिथून उत्पादन सुरू होईल, असे कपूर यांनी सांगितले.

Story img Loader