हवाई वाहतूक क्षेत्रातील आकासा एअर ही कंपनी आणखी चार बोइंग ७३७ मॅक्स विमाने खरेदी करणार आहे. वर्षाच्या अखेरपर्यंत या विमानांची तीन अंकी प्रमाणातील मागणी नोंदवणार असल्याचेही कंपनीने बुधवारी जाहीर केले. आकासा एअरने याआधी बोइंग ७३७ मॅक्स या जातीच्या ७२ विमानांची मागणी नोंदविलेली आहे. त्यात आणखी चार विमानांची भर घालण्यात आली आहे.
ताफ्यातील विस्ताराची ही घोषणा कंपनीने पॅरिसमधील एअर शोमध्ये सहभागाच्या दरम्यान केली. कंपनीने आखलेल्या विस्तार धोरणानुसार, या वर्षाच्या अखेरीस विमानांची तीन आकडी मागणी नोंदवली जाणार आहे. आकासा एअरने आतापर्यंत एकूण ७६ बोइंग ७३७ मॅक्स विमानांची नोंदवलेल्या मागणीत २३ विमाने ७३७-८ प्रकारची आणि ५३ विमाने उच्च क्षमता असलेल्या ७३७-८-२०० या प्रकारची आहेत.
वर्षाअखेरपर्यंत आंतरराष्ट्रीय उड्डाणांचे उद्दिष्ट
मागील वर्षी ऑगस्ट महिन्यात कार्यारंभ सुरू करणाऱ्या आकासा एअरने व्यवसाय विस्तारासाठी नवीन विमानांची मागणी नोंदविली आहे. पुढील चार वर्षांत कंपनीला ही विमाने मिळणार आहेत. कंपनीकडे सध्या १९ विमाने असून, त्यात जुलै महिन्यात आणखी एका विमानाची भर पडेल. चालू वर्षाच्या अखेरपर्यंत आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरू करण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे.