नवी दिल्ली : अलीबाबा समूहाची उपकंपनी असलेल्या अँटफिन सिंगापूरने घरोघरी खाद्यपदार्थाचा बटवडा करणारे व्यासपीठ असलेल्या झोमॅटोमधील २.२ टक्के हिस्सेदारी कमी केली आहे. अँटफिन सिंगापूरने तिचा झोमॅटोमधील हिस्सा सुमारे निम्म्याने कमी केला असून खुल्या बाजारात ४,७७१ कोटी रुपये मूल्याचे समभाग विक्री केले आहेत.
हेही वाचा >>> बँकांकडूनच वाढती उसनवारी! जुलैअखेर एकूण कर्जभार ९ लाख कोटींपुढे
दोन ब्लॉक डील व्यवहाराच्या माध्यमातून प्रत्येकी २५७.४६ रुपये आणि २५७.१७ प्रतिसमभागाप्रमाणे ही विक्री करण्यात आली. याआधी मार्च महिन्यात २.१ टक्के हिस्सा विक्री केली होती. भारत आणि चीन यांच्यातील सीमेवरील वाढत्या तणावाच्या परिस्थितीत भारतातील चिनी गुंतवणुकीची वाढती छाननी होत असताना हे पाऊल उचलले असल्याचे बोलले जात आहे. गेल्यावर्षी २०२३ च्या सुरुवातीला, अँट समूहाच्या अलीपेने, झोमॅटोमधील ३.४४ हिस्सा पूर्णपणे विकला. भारतातील शहरी ग्राहक किराणा माल आणि घरगुती वस्तूंसाठी ऑनलाइन मंचाकडे आकर्षित होत असताना, झोमॅटो आणि तिची प्रतिस्पर्धी स्विगी सारख्या ॲप-आधारित डिलिव्हरी कंपन्यांकडे गुंतवणूकदारांचा ओढा वाढला आहे. विद्यमान वर्षात झोमॅटोच्या समभागाचे मूल्य दुपटीहून अधिक वधारले आहे. झोमॅटोच्या समभागाने वर्षभरात १९४.८४ टक्के परतावा दिला आहे.