१ सप्टेंबरपर्यंत सर्व स्थावर संपदा क्षेत्रातील एजंटसना विशिष्ट प्रशिक्षणानंतर प्रमाणपत्र प्राप्त करणे महारेराने अत्यावश्यक केलेले आहे. असे असताना प्रत्यक्षात आतापर्यंत फक्त २१३४ उमेदवारांनी नावे नोंदविलेली आहेत. यापैकी ४२३ उमेदवारांनी परीक्षा दिली असून ४०५ उमेदवार उत्तीर्ण झाले आहेत. राज्यात सुमारे ३९ हजार स्थावर संपदा एजंटस कार्यरत असून, त्यांना १ सप्टेंबरपूर्वी प्रशिक्षण पूर्ण करून परीक्षा देऊन प्रमाणपत्र प्राप्त करणे आवश्यक आहे. ही बाब महारेराने १० जानेवारीला एका परिपत्रकाद्वारे जाहीर केलेली आहे.
या सर्वांनी प्रमाणपत्र प्राप्त केले नाहीतर १ सप्टेंबरनंतर त्यांना एजंट म्हणून काम करता येणार नाही, असे महाराराने पुन्हा स्पष्ट केले आहे. यात सर्व विकासकांनी आपल्या एजंट्सना हे प्रमाणपत्र प्राप्त करून घेण्यासाठी प्रोत्साहित करावे आणि जे सध्या नोंदणीकृत एजंटस आहेत त्यांनीही १ सप्टेंबर पूर्वी हे प्रमाणपत्र प्राप्त करून घ्यावे, यासाठी महारेराने विकासक आणि एजंटस यांना स्मरणपत्रे पाठविली आहेत.
हेही वाचाः आदिपुरुषच्या कामगिरीवर PVR Inox च्या गुंतवणूकदारांचं लक्ष; चित्रपट चालला तर शेअर धावणार
स्थावर संपदा क्षेत्रातील ‘एजंट’ हा घर खरेदीदार आणि विकासक यांच्यातील अत्यंत महत्त्वाचा दुवा आहे. बहुतेक वेळा ग्राहक पहिल्यांदा एजंटसच्याच संपर्कात येतात. ग्राहकांना प्रकल्पाच्या अनुषंगाने प्राथमिक माहिती त्यांच्याकडूनच मिळते. एजंटसचे हे महत्त्व लक्षात घेऊन या क्षेत्रात कार्यरत सर्व एजंटसना रेरा कायद्यातील महत्वाच्या तरतुदी माहीत असायला हव्यात. त्यांच्याकडून ग्राहकाला आदर्श विक्री करार( Agreement for Sale), घर नोंदणी केल्यानंतर दिले जाणारे नोंदणी पत्र ( Allotment letter) चटई क्षेत्र, दोष दायित्व कालावधी अशासारख्या विनियामक तरतुदींची प्राथमिक माहिती देताना त्यात समानता, सातत्य आणि स्पष्टता असायला हवी. या माहितीच्या आधारेच ग्राहक घरखरेदीचा निर्णय घेतात. म्हणून ग्राहकांचं हित डोळ्यांसमोर ठेवूनच महारेराने हे प्रशिक्षण आणि प्रमाणपत्र बंधनकारक केलेले आहे. हे प्रमाणपत्र प्राप्त न करणाऱ्या एजंटसना १ सप्टेंबरपासून एजंटस म्हणून काम करता येणार नाही, हे महारेराने पुन्हा स्पष्ट केले आहे.
हेही वाचाः ६३ हजार कोटी रुपये : सरकारी कंपन्या इतिहास घडवणार! तिजोरीत विक्रमी डिव्हिडंडची भर टाकणार